पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११२ फुटी शिवप्रतिमेचे अनावरण


कोईमतूर- महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर इशा येाग केंद्राचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी डिझाईन केलेल्या ११२ फुटी शिवप्रतिमेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आदियोगी महादेवाची ही प्रतिमा जगभरातील शिवप्रतिमांपेक्षा आगळीवेगळी आहे. ११२ फूट उंचीच्या या प्रतिमेत शिवाचा फक्त चेहराच आहे. मुक्तीचे प्रतीक म्हणून तयार केलेली ही प्रतिमा योगाच्या ११२ मार्गांचे प्रतीक म्हणून बनविली गेली आहे.

या प्रतिमेचे अन्य वैशिष्ठ म्हणजे स्टीलचे तुकडे जोडून व देशी तंत्रज्ञानाचा वापर करून ती बनविली गेली आहे. तसेच शिवासमोरील नंदीची प्रतिमाही याच पद्धतीने व तीळ, हळद, भस्म, माती व वाळूच्या सहाय्याने तयार केली गेली आहे. यावेळी मोदींच्या हस्ते महायोग यज्ञाची सुरवात केली गेली. या प्रतिमेमागचा उद्देश येत्या वर्षात १० लाख प्रशिक्षक प्रत्येकी किमान १०० लोकांना सरल योगाचे प्रशिक्षण देऊन पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत योग १० कोटी लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. प्रतिमेचे डिझाईन तयार करण्यासाठी अडीच वर्षे लागली व आठ महिन्यात ती तयार केली गेल्याचेही समजते.

प्रतिमा अनावरणानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. जीव ते शिवापर्यंतचा हा प्रवास आहे. देवात देव महादेव, मंत्रात मंत्र महामृत्युंजय व रात्रीत रात्र महाशिवरात्र असा शिवाचा महिमा आहे. मी सोमनाथाच्या भूमीतला आहे व राजकारणामुळे सोमनाथापासून विश्वनाथापर्यंत म्हणजे काशीपर्यंत पोहोचलो आहे. मी जेथे जातो, शिव माझ्या बरोबर आहेत. पाश्चिमात्यानीही आता योग स्वीकारला आहे. भारताची अनेकता हा संघर्ष नाही तर अनेकतेतून एकता ही आपली संस्कृती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *