या जमातीतील प्रत्येकजण अब्जाधीश


अमेरिकेतील मिनिसेाटा राज्यातील एक जमात अतिश्रीमंत म्हणून प्रसिद्धीस आली असून या जमातीतील प्रत्येक सदस्याची कमाई दर महिन्याला सरासरी ५६ लाख म्हणजे प्रत्येक वर्षाला साडेसहा कोटींपेक्षा अधिक आहे. शेकोपी मेवकंटोन नावाच्या या जमातीतील सदस्यांकडे लग्झरी कार्स, अनेक देशांत स्वतःच्या मालमत्ता, मुले महागड्या शाळांतून शिकविणे व अन्य सर्व सुखसुविधा आहेत. ही जमात पूर्वीपासून धनाढ्य नाही. या लोकांनीही गरीबी पाहिली आहे, बर्फ वितळवून पाणी पिण्याचे कष्ट त्यांनीही घेतले आहेत. मात्र या भागातील एका व्यवसायामुळे त्यांना ही कुबेरी श्रीमंती आली आहे. होय, हे लोक या भागात सुरू असलेल्या कॅसिनोमध्ये गँबलर म्हणून व्यवसाय करतात व त्यातून त्यांना हा प्रचंड पैसा मिळतो.


या जमातीचे ४८० सदस्य आहेत. एक काळ असा होता की त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नसे व अगदी साध्या घरातून ते राहात असत. मात्र कॅसिनो रेस्टॉरंटमुळे येथील सर्व व्यापारच बदलून गेला. आज या भागात १० पेक्षा अधिक मोठे कॅसिनो आहेत. त्यातील मिस्टीक लेक हे हॉटेल कॅसिनो सर्वात मोठे असून हा कॅसिनो बड्या कॅसिनोमधील चार नंबरचा इंडियन कॅसिनो आहे. पाच रेस्टॉरंट, ६०० खोल्या असलेले हे मोठे हॉटेल आहे. या कॅसिनोतून शेकोपी जमातीचे लोक गँबलिग करून प्रचंड पैसा मिळवितात. त्यांचे शौकही महागडे आहेत. महागड्या कार्स, महागड्या हॉटेल्समधून राहणे हे नित्याचेच. मात्र आजही हे लोक परंपरागत जुन्या घरांतूनच राहतात.इतक्या प्रचंड पैशांमुळे जमातीतील तरूण बिघडतील अशी वृद्धांना भीती वाटते. मात्र हे लोक जसे कमावतात तसाच दानधर्मही करतात. दुसर्‍या जमातीतील लोकांना १९९६ पासून आत्तापर्यंत त्यांनी १६०० कोटींची रक्कम दान म्हणून दिली आहे. हे लोक पैसे कर्जाऊही देतात. आत्तापर्यंत त्यांनी ३१०० कोटींचे कर्जवाटपही केले आहे.

Leave a Comment