भाजपाची घोडदौड


भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण शहरी भागातही नंबर वन आहोत हे दाखवून दिले आहे. गेला महिनाभर सुरू असलेल्या प्रचार मोहिमेची परिणती भाजपाच्या वर्चस्वाचे दर्शन घडून झाली. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन मित्र पक्षातच सरळ लढत असल्याचे चित्र दिसून आले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसलेले हे दोन पक्ष परस्परांवर मोठ्या अहमहमिकेने तुटून पडले होते. भाजपाच्या राज्यात जनता सुखी नाही आणि हे सरकार काहीही कामाचे नाही असा प्रचार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने करणे साहजिकच होते पण अशा प्रकारच्या बिन कामाच्या सरकारमध्ये पदे मिळवून लाल दिव्याच्या गाडीची शान बाळगणार्‍या सत्तेतल्या सहभागी पक्षानेही भाजपाचे वाभाडे काढले. मात्र जनतेने शिवसेनेची ही टीका फारशी मनावर न घेता भाजपाला भरभरून मते दिली. मुंबईत भाजपा आणि शिवसेेनेची युतीची सत्ता होती पण शिवसेनेने जसे सत्तेवर राहूनही भाजपाला टीकेचे धनी केले तसेच भाजपाने मुंबई महापालिकेत शिवसेनेशी भागिदारी करूनही शिवसेनेलाच टीकेचे लक्ष्य केले.

या दोन पक्षातली ही लुटुपुटीची कुस्ती होती असे म्हणावे तर या दोघांनीही परस्पराच्या बाबतीत अपशब्द वापरताना हातचा एकही शब्द ठेवलेला नव्हता. त्यातल्या त्यात शिवसेनेला मुंबईत भाजपाशी युती करायची होती पण ती युती झाल्यानंतर मुंबईतली सत्ता आपल्याच हातात राहील असे वाटप हवे होते. शिवसेनेच्या या दृष्टीकोनाची परीक्षा विधानसभा निवडणुकीत झालेली होती आणि त्यात भापजाचे म्हणणे खरे ठरले होते. मुंबईतले जागावाटप समसमान व्हावे असा भाजपाचा हेका होता. त्यावर शिवसेनेला फार मोठा फणकारा आला. भाजपाची औकात फार तर ६० जागा लढवण्याची आहे असा शिवसेनेने भाजपाला टोला मारला पण भाजपाने आपली औकात ६० जागा लढवण्याची नसून ८१ जागा जिंकायची आहे हे दाखवून दिले आणि शिवसेनेचे दात तिच्याच घशात घातले. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शिवसेनेचे सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या डरकाळ्याचे नाटक झाले. पण निदान निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत तरी शिवसेनेचा पाठींबा चालू आहे. सरकारचा पाठींबा काढून घेण्याबाबत सतत बोलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातले अशाच वल्गना करणारे संजय राऊत, आदित्य ठाकरे, रामदास कदम हे नेते आता निरर्थक ठरले आहेत.

भाजपाने मुंबईत ८१ जागा मिळवून शिवसेनेची जागा आपल्या बरोबरचीच असल्याचे कायमसाठी दाखवून दिले आहे. राजकीय पक्षांच्या ताकदी बाबत केवळ बोलण्याने काहीच स्पष्ट होत नाही. युतीत असणार्‍या पक्षांमध्ये तर त्यांची ताकद युतीत दिसून आलेली असते. त्यामुळे युती किंवा आघाडी करून निवडणुका लढवणारे पक्ष नेहमीच परस्परांच्या खर्‍या ताकदीबाबत हेटाळणीने बोलत असतात. मात्र एकदाचे स्वतंत्रपणे लढायला लागले की, त्यांना आपल्या खर्‍या ताकदीची जाणीव होते. शिवसेनेने आपण भाजपाशी युती करून २५ वर्षे कुजलो असे म्हटले होते. आता आपण स्वतंत्रपणे लढून त्यापेक्षा चांगले यश मिळवू शकतो हे त्यांनी दाखवून द्यायला हवे होते. तसे शिवसेनेला दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता भाजपाचेच नेते असे म्हणू शकतात की युतीत शिवसेनेला मर्यादेपेक्षा अधिक जागा मिळत होत्या आणि युती करून भारतीय जनपा पार्टीच कुजली आहेे. आता ती मोकळी झाली आहे. शिवसेनेने मुंबईतली युती मोडताना किंवा त्यापूर्वीही मोठा स्वाभीमानाचा आव आणला होता. आता मर्यादित यश मिळाले असले तरीही शिवसेनेने काही नाराज होऊ नये. आता आपल्या ताकदीवर मोेठे होऊन दाखवावे.

लोकसभा वगळता सगळ्या निवडणुका भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढवल्या आहेत. यापुढच्या काळात एखादी निवडणूक दोघांनी मिळून लढवायची ठरवलेच तर कोणाची ताकद किती याचा आधार घ्यावा लागेल. तो आधार आता या दोन्ही पक्षांनी निर्माण केला आहे. हे दोन पक्ष पुढे कधी वाटाघाटील बसले तर भाजपाचे नेते आताचे हेच आकडे आपली ताकद म्हणून दाखवतील आणि शिवसेनेला नमते घ्यायला भाग पडतील. अशा रितीने शिवसेनेने आपल्या मर्यादा स्वत:च्या हातानेच घालून घेतल्या आहेत. मुंबईत हे पक्ष समसमान यशाचे धनी झाले आहेत. ठाण्यात मात्र शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. बाकीच्या कोणत्याही महापालिकेत भाजपाने शिवसेनेपेक्षा आपली ताकद दाखवून दिली आहे. नागपूर वगळता कोणत्याही महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवलेले नाही पण थोडी जमवाजमव करून तिथे भाजपाला आपले महापौर निवडता येणार आहेत. भाजपाची ताकद ग्रामीण भागात फारशी नाही असे म्हटले जात होते पण आता जिल्हा परिषदांतही ती ताकद भाजपाने दाखवून दिली आहे. २५ जिल्हा परिषदांत आपले बहुमत सिद्ध केले आहे. तर अनेक जिल्हा परिषदांत अन्य पक्षांच्या बरोबरीचे यश मिळवले आहे. नगर पालिकांच्या निवडणुकांत भाजपाने आपला पक्ष नंबर वन असल्याचे दाखवून दिले होतेच पण आता महापालिकेेत आणि जिल्हा परिषदांतही तेच दाखवून दिले आहे.

Leave a Comment