स्टेंटच्या किंमतीतील नफेखोरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन हृदयविकारावरील इलाजासाठी लागणार्‍या स्टेंटच्या किंमती मर्यादित ठेवण्याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायला लावले. त्यामुळे स्टेंटच्या विक्रीतील आणि वापरातील नफेखोरीला मोठा आळा बसणार आहे. या नफेखोरीची चौकशी करण्यासाठी नॅशनल फामॅस्युटिकल प्राईसिंग ऑथॅरिटी (एनपीपीए) यांनी एक समिती नेमली होती. त्यांनी स्टेंटच्या किंमतीबाबत खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा स्टेंटचे निर्माते, विक्रेते, आयातदार, रुग्णालये आणि डॉक्टर्स मिळून रुग्णांना किती लुटत होते हे लक्षात आले आणि ते चक्रावून गेले. दोन प्रकारचे स्टेंट वापरले जातात. त्यातल्या एका प्रकारातील विक्रेते २७ टक्के नफा घेतात. तर दुसर्‍या प्रकारातील स्टेंटचे विक्रेते ५४ टक्के नफा घेतात असे दिसून आले.

हे स्टेंट पुढे पाठवले जातात आणि त्यांचा वापर करताना रुग्णालये त्यांची जी किंमत लावतात ती लावताना एका प्रकारातल्या स्टेंटसाठी १९६ टक्के नफा घेतला जातो. तर दुसर्‍या प्रकारच्या स्टेंटसाठी ६५४ टक्के नफा घेतला जातो असे दिसून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर या समितीने स्टेंटच्या किंमतीवर नियंत्रणे आणण्याची शिफारस तर केलीच. पण आपल्या शिफारसीमध्ये या नफेखोरीचे वर्णन व्हल्गर प्रॉफिटेरिंग अशा शब्दात केले. याचा मराठीतला अर्थ बिभत्स, भीषण नफेखोरी असा होतो. म्हणजे स्टेंटच्या किंमती वाढण्यातले खरे खलनायक कोण याचा शोध घेतला तेव्हा संशयाची सुई डॉक्टरांकडेच वळली. उत्पादक आणि विके्रत्यांनी स्टेंटच्या किंमतीत एवढी प्रचंड नफेखोरी करून पैसा कमवल्याचे मान्य केले. परंतु हा अतिरिक्त नफा डॉक्टर्स आणि रुग्णालये यांच्यावरच खर्च होतो. असे स्पष्टपणे नमूद केले.

या समितीने या संबंधातल्या सगळ्या घटकांच्या संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले होते. डॉक्टर मंडळी स्टेंटच्या किंमतीमध्ये अशी अनैतिक कमाई करतात त्यामागचे कारण काय असा जाब त्यांच्या प्रतिनिधींना विचारला असता त्यांनी या नफेखोरीचे समर्थनच केले. हृदरोगावर इलाज करण्यासाठी अतीशय महागडी उपकरणे खरेदी करावी लागतात. प्रचंड गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक वसूल होण्यासाठी अशा प्रकारे भरमसाठ किंमती लावाव्याच लागतात असे निर्लज्ज समर्थन या प्रतिनिधींनी केले. खरे म्हणजे अशी नफेखोरी केली नाही तरीही केलेली गुंतवणूक वसूल होऊ शकते. परंतु त्यासाठी थोडा कालावधी लागतो एवढेच. परंतु डॉक्टर मंडळींना झटपट गुंतवणूक वसूल करायची असते. तिच्यासाठी रुग्णांवर कसलीही दयामाया न दाखवता प्रचंड फी लादली जाते.

Leave a Comment