ओरिसा पंचायत निकाल


महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा गदारोळ सुरू असताना ओरिसात होत असलेल्या अशाच निवडणुकांकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे. मात्र ओरिसात पाच टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवून सर्वांन चकित केले आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाले असले तरी ओरिसा, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि केरळ या चार राज्यांमध्ये या पक्षाची निराशा झाली होती. ही निराशा एवढी होती की या चार राज्यांमध्ये भाजपाला पाय ठेवायलाही जागा मिळाली नव्हती. मात्र त्यामुळे निराश न होता या चारही राज्यांमध्ये आगेकूच करण्यासाठी भाजपाच्या संघटकांनी कंबर कसली आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.

२०१२ साली झालेल्या पंचायतीच्या निवडणुकींमध्ये एकूण ८५० जागांपैकी केवळ ३६ जागा भाजपाच्या पदरात पडलेल्या होत्या. परंतु आता झालेल्या निवडणुकीमध्ये ८५० पैकी ३०६ जागा जिंकून भाजपाने आपल्या जागांच्या संख्येत ९ पट वाढ केली. ओरिसामध्ये सत्तेवर असलेल्या बिजू जनता दल या पक्षाचे मुख्यमंंत्री भाजपाच्या या पटीतल्या यशामुळे हवालदिल झाले आहेत. कारण त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. २०१२ साली त्यांनी ८५० पैकी ६५१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या या जागांमध्ये जवळपास २०० जागांची घट झाली आहे आणि त्यांच्या वाट्याला केवळ ४६० जागा आल्या आहेत. त्यांचा याबाबतीतला क्र्रमांक पहिला आहे. परंतु २०१२ साली बिजू जनता दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्या जागांमध्ये ६१५ जागांचा फरक होता. तो फरक आता १५० जागांववर आला आहे.

या निवडणुकीत बिजद प्रमाणेच कॉंग्रेसलाही मोठी पिछेहाट सहन करावी लागली आहे. २०१२ साली कॉंग्रेसने ८५० पैकी १२६ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या पदरात केवळ ६६ जागा आल्या. म्हणजे त्यांच्या जागांमध्ये निम्मी घट झाली. या निवडणुकीने भारतीय जनता पार्टी हा राज्यातला प्रमुख राजकीय पक्ष असल्याचे सिध्द झाले आहे. कॉंग्रेसची ही जागा भाजपाने हिसकावून घेतली आहे. गेल्या १७ वर्षांपासून ओरिसामध्ये बिजू जनता दलाचे राज्य आहे आणि २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तेथे भाजपाचा दारूण पराभव झालेला आहे. मात्र आता २०१९ साली भारतीय जनता पार्टी बिजू जनता दलासमोर मोठे आव्हान उभे करील असे दिसायला लागले आहे.

Leave a Comment