टेलिनॉर होणार भारती एअरटेलमध्ये विलिन


मुंबई: नॉर्वेची टेलिकॉम कंपनी टेलिनॉर आपला भारतातील कारभार गुंडाळणार असून त्यांचा भारतातील व्यवसाय आघाडीची मोबाईल कंपनी भारती एअरटेल ताब्यात घेणार आहे. या विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून हा व्यवहार नेमका किती रकमेचा आहे; हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

टेलिनॉर इंडियाचा देशातील उत्तरप्रदेश (पूर्व व पश्चिम), गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार आणि आसाम या ७ टेलिकॉम परिमंडळामध्ये विस्तार असून कंपनीचे दि. ३१ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार एकूण ५ कोटी ग्राहक आहेत. या विलिनीकरणामुळे एअरटेलच्या १८०० मेगाहर्टझमध्ये टेलिनॉरच्या ४३.४ मेगाहर्टझ स्पेक्ट्रमची भर पडणार आहे. त्यामुळे कंपनीला अधिक प्रभावीपणे ४ जी सुविधा देणे शक्य होणार असून रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करण्यासाठी ते महत्वाचे आहे.

या विलिनीकरणानंतर एअरटेलचा देशातील मोबाईल सेवा बाजारपेठेतील वाटा ८ टक्क्यांनी वाढणार आहे.

Leave a Comment