महागड्या बाटलीबंद पाण्याला भारतात वाढती मागणी


भारतात प्रिमियम बाटलीबंद पाण्याचा बाजार तेजीने वाढताना दिसून येत आहे.२०१५ मध्ये आठ हजार कोटींचा असलेला हा बाजार २०१८ पर्यंत १५ हजार कोटींवर जाईल असे संकेत मिळत आहेत. बाटलीतून शुद्ध म्हणून विकल्या जाणार्‍या या पाण्याची किंमत १८ रूपये लिटर पासून १७०० रूपये लिटर पर्यंत आहे. विशेष म्हणजे महागड्या पाणी बाटल्या परदेशातील कंपन्यांच्या असून त्यांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

यात सर्वाधिक महाग असलेला ब्रॅड आहे वॉस आर्टेशियन या नॉर्वे मधील कंपनीचा. त्यांच्या या ब्रँडच्या पाण्याला भारतात येणार्‍या विदेशींकडून जास्त मागणी आहे भारतात या ब्रँडच्या ३०० मिलीच्या सहा बाटल्या ३३३० रूपयांना मिळतात. म्हणजे १ लिटर पाण्याची किमत आहे १७०० रूपये. हे पाणी अॅमेझॉनवर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी इएमआय ची सुविधा दिली गेली आहे.

अॅव्हीयन नॅचरल्स मिनरल वॉटर हा स्वित्झरलँडचा ब्रँड असून भारताचा क्रिकेट कप्तान विराट कोहली हेच पाणी पितो. या पाण्याची किमत लिटरला ५०० रूपये आहे. स्वित्झर्लंडच्या नेस्ले कंपनीचा पेरियर स्पार्कलिंग वॉटर लिटरला ३६० रूपये किमतीचा असून हा ब्रँड मुळचा इटलीचा आहे. तो ही अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. इटलीचाच अॅक्वा पन्ना या मिनरल वॉटरच्या २ बाटल्यांचा पॅक स्नॅपडीलवर ३३७ रूपयांना उपलब्ध आहे. तर फिनलंडच्या वीन या मिनरल वॉटरला भारतात खूपच मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भारतात विन क्लासिक व विन स्टील असे दोन ब्रँड लाँच केले आहेत. त्याच्या ७५० मिली बाटलीची किमत आहे ६० रूपये.

त्यापाठोपाठा टाटा व पेप्सिको जॉईंट व्हेंचर नरिशको ब्रँडखाली विकली जाणारी टाटा हिमालयन ही पाणी बाटली भारतात ६० ते ९० रूपये लिटरने विकली जात आहे. बिस्लेरी वेदिका ४० ते ५० रूपये लिटर असून ही भारतातील मिनरल वॉटर व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी आहे. अॅक्वाफिना व किंगफिशर मिनरल वॉटर २० रूपये लिटर असून बॅली १८ रूपये लिटर आहे.

Leave a Comment