बँकेतून जेवढी गरज तेवढेच पैसे काढा – केंद्र सरकार


नवी दिल्ली – २० फेब्रुवारीपासून बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढवल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत देशात पुन्हा चलनटंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी या पार्श्वभूमीवर लोकांना बँक किंवा एटीएममधून गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याची तक्रार येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लोकांनी त्यांना हवे तेवढचे पैसे काढावेत, गरजेपेक्षा जास्त पैसे काढल्याने इतरांना पैसे मिळत नसल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. तर दुसरीकडे दास यांनी १००० रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची शक्यताही यावेळी फेटाळून लावली. आम्ही सध्या पाचशे आणि त्यापेक्षा कमी मुल्याच्या नोटा छापण्यावर भर देत आहोत, असे दास यांनी ट्विटर अकाऊंटवरून सांगितले.

काही दिवसांपूर्वी बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध उठविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. यापूर्वी बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येत होती. मात्र, २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा ५० हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहील. त्यानंतर १३ मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.

Leave a Comment