‘भारताचे विक्रमी उपग्रह प्रक्षेपण म्हणजे चीनसाठी धोक्याची घंटा!’


भारताने 104 उपग्रहांचे केलेले विक्रमी प्रक्षेपण हे चीनसाठी धोक्याची घंटा आहे. चीनी कंपन्यांनी आपला खर्च कमी करून भारताशी अंतराळात स्पर्धा करावी, असा सल्ला चीनच्या सरकारी माध्यमांनी दिला आहे.

“गेल्या काही दिवसांत, अंतराळ स्पर्धेत चीन भारताच्या मागे पडला आहे का, ही चर्चा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. भारताने 104 उपग्रहांना यशस्वीरीत्या त्यांच्या कक्षेत स्थापन करणे, ही चीनच्या व्यावसायिक अंतराळ उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे. या 104 उपग्रहांपैकी 96 हे अमेरिकेचे आहेत. त्यामुळे व्यावसायिक रॉकेट प्रक्षेपण सेवेच्या क्षेत्रात भारत हा कडवा प्रतिस्पर्धी ठरू शकतो. देशाने यातून अनेक धडे घेण्यासारखे आहे,” असे ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रातील एका लेखात म्हटले आहे.

“भारताशी स्पर्धा करण्यासाठी चीनला व्यावसायिक अंतराळ सेवा खर्च कमी करावा लागेल,” असे या लेखाचे शीर्षक आहे.

“व्यावसायिक अंतराळ सेवेच्या क्षेत्रात भारताशी स्पर्धा अपरिहार्य ठरेल. त्यामुळे उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापन करण्याच्या बाजारपेठेत विस्तार करायचा असेल, तर चीनला खर्च कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील,” असे त्यात म्हटले आहे.

याच वृत्तपत्रातील अन्य एका लेखात म्हटले आहे, की उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने चीनपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे.

Leave a Comment