दहा रुपयांचे नाणे वैधच, अफवांना बळी पडू नका : आरबीआय


दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झाल्याच्या अफवेमुळे उडालेल्या गोंधळानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) खुलासा प्रसिद्ध केला आहे. हे नाणे अद्याप वैध असून लोकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

“अशा नाण्यांच्या अस्सलपणाबाबत शंका असलेले काही अज्ञानी किंवा अडाणी लोक सामान्य लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत, असे समोर आले आहे. यात व्यापारी, दुकानदार इ. चा समावेश असून त्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये या नाण्यांच्या व्यवहारात अडथळे येत आहेत. यामुळे अपरिहार्यपणे गोंधळ निर्माण होत आहे,” असे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे.

तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये दहा रुपयांच्या नाण्याबाबत अफवा पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुकानदार ग्राहकांना नाण्यांनी भरलेल्या थैल्या दाखवत असून त्या आरबीआयकडे जमा करायच्या आहेत, असे सांगत आहेत.

दहा रुपयांच्या अस्सल व खोट्या नाण्यांना कसे ओळखायचे, याबाबच व्हाट्सअॅपवर आलेल्या एका संदेशामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हा संदेश 8 नोव्हेंबर रोजी सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यापूर्वीच सुरू झाला होता मात्र तो अलीकडे व्हायरल झाला होता.

Leave a Comment