अम्मासे बढकर


तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी २०१६ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेला अनेक छप्परफाड आश्‍वासने दिली होती पण त्यातली अनेक आश्‍वासने पुरी न करताच त्या गेल्या. आता अनेक नाट्यमय घटनांनंतर मुख्यमंत्री झालेल्या पळानीस्वामी यांनी सत्तेवर आल्यानंतर आधी त्यांची आश्‍वासने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहेच पण काही आश्‍वासने अम्मांच्याही पुढे जाऊन दिली आहेत. अम्मांनी जाताना महिला, सुशिक्षित बेकार, मच्छीमार, इत्यादिंना अनेक आश्‍वासने दिली होती. ती तर स्वामी यांनी पुरी केलीच आहेत पण आपल्या पदरच्याही काही घोषणा केल्या आहेत. दारु ही संसारी महिलांची शत्रूच असते. त्यामुळे राज्यात दारुबंदी असावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. अर्थात तामिळनाडू सारख्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधीही नेत्यांचे हितसंबंध नेहमीच दारूच्या धंद्यात गुंतलेले असतात. त्यामुळे सरसकट दारूबंदी करता येत नाही.

त्यावर उतारा म्हणून जयललिता यांनी सरकारमान्य दारूची दुकानांची संख्या ५०० ने कमी केली होती. आता पळानीस्वामी यांनी आणखी ५०० दुकाने बंद करण्याचा आज आदेश दिला. असे असले तरीही अजून ५ हजार ८०० दुकाने चालूच राहणार आहेत. दारूबंदी करणे सरकारला परवडत नाही कारण या व्यवसायातून या सरकारी यंत्रणेला दरसाल २६ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. असो. ६३०० पैकी ५०० दुकाने बंद झाल्याने महिलांना किती दिलासा मिळणार हा संशोधनाचा विषय आहे. ही दुकाने टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद केली जातील असे जयललिता यांनी म्हटले होते. आता आणखी किती टप्प्यांत ही सारी दुकाने बंद होणार हे काही त्यांनी जाहीर केले नाही. पळानीस्वामी यांनी महिलांना दिलेला एक मोठा दिलासा म्हणजे प्रसूतीचे अनुदान.

प्रसूत होणार्‍या महिलांना आधी १६ हजार रुपये दिले जात असत पण आता हे अनुदान १८ हजार करण्यात आले आहे. शिवाय स्वत:चे वाहन खरेदी करणार्‍या महिलेला वाहनाच्या किंमतीच्या ५० टक्के एवढी सबसिडी दिली जाणार आहे. मच्छीमारांना आता घरासाठी १०० टक्के अनुदान मिळेल म्हणजे त्यांना जवळपास मोफतच घर मिळणार आहे. बेरोजगारांना दिला जाणारा भत्ता आता १५० रुपयांवरून ३००, २०० वरून ४०० आणि ३०० वरून ६०० असा वाढवण्यात आला आहे. यातली काही आश्‍वासने अम्मांनी दिलेली तर काही नव्या मुख्यमंत्र्यांची आहेत.

Leave a Comment