लोकसंख्या का वाढते यावर अमेरिकेतल्या काही संशोधकांनी फार विस्ताराने संशोधन केले असता असे आढळून आले आहे की, आपण समजतो तेवढ्याच घटकांवर लोकसंख्येची वाढ वा घट अवलंंबून नसते तर इतरही अनेक घटकांवर ती अवलंबून असते. आजकाल काही संपन्न देशांना लोकसंख्या घटण्याची समस्या भेडसावत आहे. मात्र त्यांच्या या घटीमागे लोकांची आणि विशेेषत: पुरुषांची जननक्षमता कमी होणे हे कारण आहे. महिलांचीही प्रजनन क्षमता कमी होत आहे पण ती कमी झाल्याने त्यांना कमी का होईना पण मुले होतात. पुरुषांचे तसे नसते. त्यांची क्षमता घटली की त्यांना मुदलातच मुले होऊ शकत नाहीत. अर्थात आता संशोधकांनी केलेले संशोधन वेगळ्या मुद्यांवर आधारालेले आहे.
लोकसंख्येची दाटी आणि कुटुंब नियोजन
ज्यांना मुले होतात म्हणजेच होऊ शकतात पण तरीही त्यांचा किती मुले असावीत याचा हिशेब त्यांचे घर कोठे आहे यावर ठरलेला असतो असे आता संशोधकांना आढळले आहे. त्यांनी अमेरिकेतल्या ५० राज्यांत आणि भारतासह अनेक देेशांत या संबंधात पाहणी केली. तेव्हा दाट लोकसंख्येच्या प्रदेशात राहणारी दांपत्ये कमी मुले व्हावीत या मतांची असतात असे दिसून आले. त्यांचे घर दाट लोकसंख्येच्या भागात असेल तर ते आपल्याला अधिकाधिक संपन्न जीवन जगण्यासाठी जास्तीत जास्त साधने प्राप्त व्हावीत असा त्यांच्या मनाचा कौल असतो. असे जीवन संपन्नतेने जगावयाचे असेल तर मुले कमी असावीत तरच कमी साधनांत चांगले जीवन व्यतित करता येणे शक्य असते असे त्यांना वाटते. तेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा किती मिळाली यापेक्षा ते लोक ती कशी मिळाली यावर भर देतात. परिणामी आपल्याला किती मुले झालीत यापेक्षा कमीच मुले पण चैनीत राहतात की नाही यावर त्यांचा भर असतो आणि त्यांना आपल्याला कमीच मुले असावीत पण ती चांगली असावीत असे वाटते.
दाट लोकवस्तीत राहणारे लोक नेहमीच स्पर्धेचा विचार करीत असतात. उलट विरळ लोकवस्तीत राहणारे लोक समाधानी असतात. आपल्याला काय मिळेल, किती मिळेल आणि कसे मिळेल यावर त्यांचा भर नसतो. म्हणून आपल्याला चांगले तेवढे मिळावे, त्यासाठी स्पर्धा करावी आणि इतरांशी बरोबरी करावी अशी त्यांची भावनाही नसते. त्यामुळे ते अधिक मुलांना जन्म देणे पसंत करतात. दाट वस्तीतले लोक लग्नही उशिरा करतात. मुलांच्या जन्मांचे प्लॅनिंगही करीत असतात. त्यांना कमी मुले हवी असतात.