पहिले इंटर ऑपरेबल पेमेंट सोल्यूशन भारत क्यूआर कार्यरत


कॅशलेस इंडिया योजनेत आणखी एक पाऊल पुढे टाकत बँकांच्याच अॅपचा वापर करून मोबाईलच्या सहाय्याने पेमेंट करण्याची सुविधा भारत क्विक रिस्पॉन्स (भारत क्यूआर) सोमवारी सुरू करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांच्या हस्ते केले गेले असून सध्या ही सेवा १० बँकातून सुरू झाली आहे. एनपीसीआय, मास्टर्स कार्ड व व्हिसा यांनी संयुक्तरित्या ही सेवा सुरू केली आहे.

या सेवेच्या निमित्ताने पहिलेच इंटर ऑपरेबल पेमेंट सोल्यूशन सुरू झाले असल्याचे सांगितले जात आहे. याची रचना मोबाईल वॉलेट पेमेंटच्या धर्तीवर असली तरी मोबाईल वॉलेट पेमेंटमध्ये ग्राहकांना अगोदर पैसे भरावे लागतात. या सेवेत बँकेत असलेल्या पैशांतूनच थेट पेमेंट होऊ शकणार आहे. यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. ग्राहकांकडे असलेल्या बँकेच्या मोबाईल अॅपच्या सहाय्यानेच हे वापरता येणार आहे. सध्या १० बँकानी ही सुविधा दिली आहे व ही सुविधा वापरून १४ बँका पेमेंट स्वीकारणार आहेत. या पेमेंटसाठी डेबिट क्रेडीट कार्डची गरज नाही. लवकरच या पेमेंट येाजनेतील बँकांची संख्या वाढणार असल्याचेही समजते.