येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातल्या सगळ्या शाळांत क्रीडा हा सक्तीचा विषय करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारनेच नेमलेल्या एका समितीने तशी शिफारस केली असून सरकारने ती मान्य केली आहे. शाळांतून खेळाची सक्ती केल्याशिवाय आणि तो अभ्यासातला एक अनिवार्य विषय केल्याशिवाय देशात खेळांना अनुकूल वातावरण निर्माण होणार नाही असे या समितीने आपल्या शिफारसीत म्हटले आहे. गेल्या वर्षी रिओ ऑलिंपिक स्पर्धा झाल्या. अनेक लहान सहान देशांनी या स्पर्धेतली पदके लुटली. पण १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा चमू दोन अंकी संख्याही गाठू शकला नाही. मुलींनी देशाची अब्रू राखली म्हणून बरे झाले नाहीतर भारताच्या नावावर या स्पर्धेत एकही पदक लागू शकले नसते. दर चार वर्षाला या स्पर्धा होतात आणि त्यात आपल्या खेळाडूंचे वाईट प्रदर्शन होते. मग आपल्या देशात चर्चा सुरू होते. एवढा मोठा देश या स्पर्धेतून हात हलवत परत येतो ही किती मोठी नामुष्की आहे यावर व्याख्याने झोडली जातात आणि चर्चा थांबली की त्यावरच्या उपाय योजनाही थांबतात.
क्रीडा विषय सक्तीचा
आपण या दिशेने सक्रि य पाऊल टाकत नाही तोपर्यंत आपल्याला या स्पर्धेत यश मिळू शकत नाही. हे सक्रिय पाऊल म्हणजे देशात खेळांना अनुकूल वातावरण निर्माण करणे. ते तसे निर्माण होत नाही म्हणून आपण मागे पडतो. आपल्या देशात शंभरामागे एकजण खेळाडू असतो. खरे तर जन्माला येणार्या प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. सामान्य माणसे वेगळी आणि खेळडू वेगळे अशी स्थिती असता कामा नये. पण आपल्या देशात ती तशी आहे. जर्मनीत खेळाला अतीशय अनुकूल वातावरण आहे. तिथे प्रत्येक तिघामागे एक जण कोणत्या ना कोणत्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार्या क्रीडा मंडळाचा सदस्य असतो. भारतात तशी स्थिती नाही. भारताच्या लोकसंख्येत ६५ टक्के तरुण आहेत. त्यामुळे खेळाडूंची संख्या जास्त असायला हवी. पण देश एवढा तरुण असतानाही क्रीडा क्षेत्राची अवस्था दयनीय आहे. कारण खेळाला प्रोत्साहन नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी काय आणि कसे खेळते यापेक्षा तिला किंवा त्याला परीक्षेत किती मार्क मिळतात याला जास्त महत्त्व दिले जाते. आता सरकार शालेय स्तरावर क्रीडा हा सक्तीचा विषय करणार आहे. असा काही निर्णय घेतला तरीही तो पहिल्याच वर्षी पलिही ते बारावी अशा सार्या वर्गांना सक्तीचा करता येणार नाही. पहिलीच्या वर्गाला सक्तीचा करून त्याची सुरूवात करावी लागेल.
दरवर्षी एकेका वर्गाला हा विषय सक्तीचा करता करता येत्या आठ ते दहा वर्षात आपली पुढची पिढी आपल्याला मैदानावर खेळताना आणि बागडताना दिसेल. असा निर्णय घेणे सोपे आहे पण त्याची अंमलबजावणी करणे फार अवघड आहे कारण क्रीडा हा विषय सक्तीचा केला की, प्रत्येक शाळेला मैदान असणे सक्तीचे करावे लागेल. आजकाल मोठ्या शहरांत जागा फार महाग झाल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू करणार्या संस्थाचालकांना मैदाने निर्माण करणे फार अवघड जाईल. मैदानाची सक्ती केल्याशिवाय काही क्रीडा विषय सक्तीचा करता येणार नाही. यातून काही तरी मार्ग काढावा लागेल. तरच मुले खेळायला लागतील. आपल्या देशाला महाशक्ती होण्याचे वेध लागले आहेत. पण आपले महाशक्ती होणे हे आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. आपली आताची या पिढीची अवस्था फार चांगली नाही. या पिढीला दोन समस्या एकाच वेळी भेडसावत आहेत. एक समस्या आहे कुपोषणाची आणि दुसरी आहे अतिपोषणाची. समाजातल्या एका वर्गात मुलांना पोटापुरतेही अन्न मिळत नाही. मिळाले तरी ते पोषक नसते. तसे ते असले तरीही या वर्गातली मुले अशक्तच असतात.
दुसर्या बाजूला अतिपोषणाची समस्या आहे. मुलांची वजने फास्ट फूड खाल्ल्याने आणि जादा खाण्याने वाढत आहेत. खायला आहे पण ते पचवायला खेळणे गरजेचे आहे. मात्र सतत संगणक, टी. व्ही. यांच्यासमोर बसून गेम खेळायची सवय लागल्यामुळे या वर्गातील मुलांमध्ये वयापेक्षा अधिक वजनाची समस्या निर्माण झालेली आहे. या दोन्ही समस्यांवर खेळणे हा उपाय आहे. एका वर्गातील मुलांमध्ये न खेळल्यामुळे अशक्तपणा आहे तर दुसर्या वर्गातील मुलांमध्ये न खेळल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षी मधूमेह झालेली मुले दिसायला लागलेली आहेत. लष्कराच्या भर्तीमध्ये जेव्हा मुले परीक्षेला येतात तेव्हा शारीरिक क्षमतेत ती कमी पडतात. एक हजार मुले ही क्षमतेची चाचणी देतात तेव्हा त्यातला एखादा मुलगा लष्करात जवान म्हणून काम करण्यास पात्र आहे असे लक्षात येते. ही फार चिंताजनक स्थिती आहे. देशात खेळांना अनुकूल वातावरण नसल्यामुळे ती निर्माण झाली आहे. एका बाजूला ही दोन समस्यांनी ग्र्रस्त असलेली मुले आहेत तर दुसर्या बाजूला चांगली शारीरिक क्षमता असून आणि खेळाला आवश्यक अशी शरीरयष्टी असूनही मुळात शिक्षणच मिळत नसल्यामुळे संधीला वंचित असलेली मुले आहेत. या सर्वांचा समन्वय साधून काहीतरी केल्याशिवाय देशातली पुढची पिढी सक्षमही होणार नाही आणि ऑलिम्पिकमध्ये पदकेही प्राप्त करू शकणार नाहीत.