अंगणवाडी मदतनिसाच्या मुलाने लष्करातत जाण्यासाठी सोडली लठ्ठ पगाराची नोकरी


पुणे: एका छोट्याशा गावात आई अंगणवाडी मदतनीस काम करते पण तिने आपल्या मुलाला उच्च शिक्षित केले. त्या मुलाला लठ्ठ पगाराची सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी मिळाली. पण त्याने ही आरामाची नोकरी सोडून देशसेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारत जाधव या तरुणाची ही कहाणी आहे. भारत सिस्टिम इंजिनियर म्हणून भारतातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विसेस) या कंपनीत कामाला होता. मात्र अलिकडेच त्याला लष्करात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळाली आणि भारतने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला धुडकावत लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.

याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून भारत जाधव हा पंचवीस वर्षांचा तरुण नोकरी करत होता. भारत मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक या गावातील आहे. जेव्हा तो पाचव्या वर्गात होता तेव्हात त्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचे छत्र हरवले. घरची परिस्थिती हालाकीची असली तरी त्याच्या आईने त्याला शिकवले. भारत लहानपणापासून एक हुशार विद्यार्थी होता. बारावी नंतर त्याने संत गजानन महाराज इंजिनियरिंग कॉलेज, शेगाव इथून इंजिनियरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्याला २०१४मध्ये हिंजेवाडी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी मिळाली. मात्र आयटी सेक्टरमध्ये त्याचे मन रमत नव्हते. कारण त्याची लहानपणापासून इच्छा लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची होती.

भारतने २०१०मध्ये सैन्यदलात दाखल होण्यासाठी एनडीएची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत त्याला अपयश आले आणि त्याची संधी हुकली. मात्र त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा संरक्षण विभागात जाण्यासाठी प्रयत्न केला. त्याने २०१६ मध्ये कम्बाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) ही संरक्षण दलाची परीक्षा दिली आणि त्यात त्याला यश आले. त्याने १५३ उमेदवारांमध्ये १०८ वा क्रमांक मिळवला असून तो एक एप्रिलला चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.

४८ आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनर या पदावर रुजू होणार आहे. केवळ भारतच नाही तर त्याचे कुटुंबीयही संरक्षण दलात आहेत. भारतची लहाण बहिण ही सीमा सशस्त्र दलात आहे. तर त्याला एक लहाण भाऊ देखील आर्मीत आहे. त्याची मोठी बहिण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात नर्स आहे. भारत म्हणतो की त्याला ऑफिसच्या एसीमध्ये बसून रोज एकसुरी का तो करू शकत नाही. मला काहीतरी वेगळं आणि देशासाठी करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी आर्मीत जाण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment