आफ्रिकेच्या टोकाला व येमेन रिपब्लीकचा एक भाग असलेले सोकोत्रा बेट हे आश्चर्याचा अद्भूत नमुना असून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश केला गेला आहे. असे सांगतात की पृथ्वीवरील खंड निर्माण झाले तेव्हा म्हणजे ६ लाख वर्षांपूर्वी हे बेट अन्य आफ्रिका खंडापासून दूर झाले व त्यामुळे त्याला लॉस्ट आयलंड म्हणजे हरविलेले बेट असेही नांव दिले गेले आहे. अनेक वर्षे या बेटाचा माणसांना पत्ताच नव्हता मात्र आता ते प्रवासी वर्गाचे लोक प्रिय डेस्टीनेशन झाले आहे. येथे. पर्यटक म्हणून जाण्यापेक्षा प्रवासी म्हणून जाणे अधिक चांगले कारण पर्यटनासाठी आवश्यक त्या सुख सुविधा येथे अजून कमी प्रमाणात आहेत.
सोकोत्रा- निसर्गसुंदर लॉस्ट आयलंड
हे असे अद्भूत बेट आहे जेथे पृथ्वीवर आढळणारे सर्व प्रकारचे जमीन प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे येथे पहाड आहेत, समुद्र किनारे आहेत, वाळवंट आहे, हिरवागार निसर्ग आहे, झुळझुळते पाणी प्रवाह आहेत आणि अगदी उजाड माळही आहेत. शिवाय या बेटावर जगातील दुर्लभ अशा ८०० प्रकारच्या वनस्पती व दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेले अनेक पक्षीप्राणीही आहेत. येथे आल्यावर आपण दुसर्या जगात आल्याचा फिल येणारच.
या भागात आजमितीला ४४ हजार नागरिक राहतात व ते आजही भूतप्रेतांवर विश्वास ठेवतात. त्यांना आपल्या बेटाच्या नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान आहे व येमेनच्या मूळ भूमीपेक्षा त्यांची संस्कृती, भाषाही वेगळी आहे. विशेष म्हणजे इतक्या विविध वनस्पती असूनही येथे फळझाडे फारशी नाहीत. जैवविविधतेने नटलेल्या या बेटावरील प्रवास सुरक्षित आहे मात्र हॉटेल्स, रिझॉर्ट कमी प्रमाणात व खूप सोयी नसलेली आहेत. त्यामुळे येथे थोडी गैरसोय सोसायची तयारी असेल तर या बेटासारखे पर्यटनसुख अन्यत्र मिळणे अवघड याची खात्री.