नवी दिल्ली – एक एप्रिलपासून दोन लाखाहून अधिक सोने किंवा सोन्याचे दागीने रोखीने खरेदी केल्यास एक टक्का उद्गम कर भरणा (टीसीएस) भरावा लागणार आहे. सध्या ही मर्यादा 5 लाखांपर्यत आहे. अर्थ विधेयक 2017 मंजूर झाल्यानंतर सोन्याचे दागिनेही सामान्य वस्तूंच्या दर्जात मोडणार आहे.
रोख दोन लाखांच्या सोने खरेदीवर टीसीएस
सामान्य वस्तूंची दोन लाखांहून अधिक खरेदी केल्यास एक टक्का टीसीएस द्यावा लागतो. याबाबत मागील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. अर्थ विधेयक 2017मध्ये पाच लाखांहून अधिक रुपयांचे सोन्याचे दागिने रोखीने खरेदी करण्याची मर्यादा हटविण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुरी झाल्यास 2017-18मध्ये तीन लाखांहून अधिक रोख व्यवहारांवर बंदी येणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास रोख व्यवहार करणार्यास तेवढ्याच रक्कमेचा दंड आकारण्यात येणार आहे. म्हणजे, तुम्ही पाच लाख रुपयांचे दागिने रोखीने खरेदी केल्यास सोनारास दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर टीसीएस आकारण्याची विशेष तरतूद नाही. त्यामुळे सोन्याचा समावेश सर्वसाधारण वस्तू गटात करण्यात येणार आहे. यामुळे दोन लाखांहून अधिक रक्कमेची दागिने रोखीने खरेदी केल्यास 1 टक्का टीसीएस द्यावा लागणार आहे.