मशिनरीचे ‘ट्रबल शूटर’ झकरियास मॅथ्यू


मुंबई: झकरियास मॅथ्यू हे यंत्रांच्या विकसनाच्या क्षेत्रात नावाजलेले एक नाव ! त्यांनी ३०० होऊन अधिक यंत्र विकसित करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी विकसित केलेल्या २७ यंत्रांना आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त आहेत. मॅथ्यू यांचा जन्म केरळमधील एका गावात, शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी सहाव्या इयत्तेत शाळेला रामराम ठोकला. मात्र पुस्तकी ज्ञानापेक्षा यंत्रांमध्ये अधिक असलेल्या मॅथ्यू यांना ‘अद्भुत,’ ‘मशीन मॅन’ अशा उपाधींनी ओळखले जाते. त्यांनी चरितार्थासाठी ट्रॅक्टर चालकाचे काम निवडले. वयाच्या २२ व्या वर्षी ट्रॅक्टरची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते; या उत्सुकतेपोटी त्यांनी ट्रॅक्टरचे सगळे सुटे भाग खोलले आणि पुन्हा जोडून ट्रॅक्टर पूर्ववत केला.

वयाच्या २० व्या वर्षीच त्यांनी पहिले उपकरण विकसित केले. हे उपकरण म्हणजे बादलीचा वापर करून बनविलेली एक पुली होती. कोट्टायमजवळ एका रस्त्याच्या कामासाठी डोंगराच्या माथ्यावरून पायथ्यापर्यंत माती वाहून नेण्याचे काम या पुलीद्वारे करण्यात आले. मॅथ्यू यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवी नव्हती की पदविकाही ! केवळ आपली प्रतिभा आणि सर्जनशीलता याच्या जोरावर त्यांनी मिळतील तशी मशीन दुरुस्तीची कामे केली. त्यामधून त्यांना तुटपुंजी रक्कमही मिळत गेली. त्यानंतर त्यांनी गोदरेज, व्होल्टाज बूट्स, सिमेन्स, लार्सन अँड टर्बो अशा मोठ्या कंपन्यांशी संपर्क प्रस्थापित केला. त्यामधून त्यांना अशा कंपन्यांमधील यंत्रणा अधिक कार्यक्षम बनविणे, त्यांच्यामधील दोष दूर करणे, यंत्र रिडिझाईन करणे अशी कामे मिळू लागली. त्याचप्रमाणे या कंपन्यांच्या गरजेनुसार काही नवीन यंत्र, यंत्रणा मॅथ्यू यांनी विकसित केली.

ग्राहकांची आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन मॅथ्यू यंत्र विकसित करतात. छोटी-मोठी कामे करीत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. निसर्गदत्त प्रतिभा, सर्जनशीलता आणि मशिनरीच्या दुरुस्ती, देखभालीचे कौशल्य याच्या जोरावर त्यांनी मशिनरी दुरुस्त करता करता मोठी झेप घेतली. आज त्यांना औद्योगिक क्षेत्रात ‘मशिनरी ट्रबल शूटर’ म्हणून ओळखले जाते.

आज भारतातील आघाडीच्या कंपन्यांमधील उच्चविद्याविभूषित आणि अनुभवसंपन्न तज्ज्ञ अधिकारीदेखील मशिनरीच्या समस्या निवारण करण्यासाठी मॅथ्यू यांना पाचारण करतात. प्रखर बुद्धिमत्ता, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि परिथितीनुसार निर्णयात बदल करण्याची समयसूचकता या गुणांचा संगम असलेले असे लोक दुर्मिळ असतात. या सर्व गुणांद्वारे पूर्ण आत्मविश्वासाने मॅथ्यू मशिनरीमधील कितीही आव्हानात्मक बिघाड दूर करू शकतात. प्रखर निर्णयक्षमता, निर्णय अमलात आणण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावणे आणि प्रामाणिकपणा याद्वारे त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
——————————–
मॅथ्यू यांनी विकसित केलेली महत्वपूर्ण मशिनरी
* रबर टॅपिंग मशीन फॉर रबर बोर्ड ( भारत सरकार)
* नारळाच्या झाडावर चढणारा रोबो ( कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ इंडिया)
* रिट्रेक्टेबल ब्रीज आणि सप्तद्वार (तिरूपती बालाजी देवस्थान)
————————
मॅथ्यू हे केरळमधील विख्यात महाविद्यालय ‘अमल ज्योती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’चे ‘मुख्य तंत्रज्ञान अधिकारी’ आहेत.

Leave a Comment