चतुर्वेदी कोठे आहेत?


आपण चर्चा करतोय ते चतुर्वेदी म्हणजे ऍड. विश्‍वनाथ चतुर्वेदी. कदाचित हे नाव कोणाच्या खिजगणतीतही नसेल. पण कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव या दोघांना चतुर्वेदी यांचे नाव चांगलेच माहीत आहे. ऍड. विश्‍वनाथ चतुर्वेदी हे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. १९९० च्या दशकात सोनिया गांधी यांच्याा प्रोत्साहनाने चतुर्वेदी यांनी मुलायमसिंग यादव यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली. मुलायमसिंग यांची संपत्ती अचानकपणे कशी वाढली असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आणि यादव कुटुंबाच्या आयकर विवरण पत्रांच्या प्रतीच प्राप्त करून त्या उघड केल्या. यादव कुटुंबाचे उत्पन्न एका वर्षात ४ कोटींवरून २० कोटीवर गेले होते. तसेच त्यांनी विवरण पत्रातच म्हटले होते.

मात्र ही १६ कोटींची वाढ कशातून झाली याचा खुलासा मुलायमसिंग यादव यांना करता आला नाही. परिणामी अंमलबजावणी संचालनालयाची धाड यादव यांच्या कुटुंबावर कधीही पडू शकते आणि मुलायमसिंग यादव यांना कधीही अटक होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या मुलायमसिंग यांनी १९९९ साली सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या सोनिया गांधींनी विश्‍वनाथ चतुर्वेदी यांना मुलायमसिंग यांच्या विरोधातील कारवाई अधिक गतीमान करण्याचा आदेश दिला. ऍड. चतुर्वेदी यांनी तो मानला. मात्र २००४ साली उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांचे सरकार सत्तेवर आले आणि विश्‍वनाथ चतुर्वेदी यांचे दिवस फिरले. त्यांना रायबरेलीमध्ये राहणेसुध्दा मुश्किल झाले.

यामुळे चिडलेले चतुर्वेदी दिल्लीत जाऊन राहिले. परंतु त्यांनी आपली कारवाई थांबवली नाही. पुढे २००८ साली मनमोहनसिंग यांचे सरकार अल्पमतात येण्याची आपत्ती कोसळली. त्यावेळी मुलायमसिंग यादव यांनी आपले ३६ खासदार मनमोहनसिंग यांच्या पाठीशी उभे करून त्यांचे सरकार वाचवले. असा पाठिंबा देण्यामागे मुलायमसिंग आणि सोनिया गांधी यांचा काय करार झाला हे कोणालाच माहीत नाही. परंतु मुलायमसिंग यांच्या मागील खटले आता थांबवावेत असा आदेश सोनिया गांधींनी चतुर्वेदी यांना दिला. आता तर मुलायमसिंग यांची समाजवादी पार्टी आणि सोनिया गांधी यांची कॉंग्रेस पार्टी उत्तर प्रदेशात हातात हात घालून चालले आहेत आणि अशा परिस्थितीत सोनिया गांधींना मुलायमसिंग यांच्या विरोधातील खटल्यात काही रस राहिलेला नाही. बिचारे चतुर्वेदी आता काय करतात हे कोणाला माहीतसुध्दा नाही.

Leave a Comment