शेकडो वर्षे एका लाकडी खांबावर टिकलेले मंदिर


भारतात मंदिरे, देवळे यांची वानवा नाही. ऐतिहासिक दृष्टीने तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून भारतातील अनेक मंदिरे वैशिष्ठपूर्ण आहेत. मात्र यात आपला शेजारी चीनही मागे नाही. चीनच्या दक्षिण पश्चिमी पहाडी भागात असलेले गान्लू मंदिर असेच वैशिष्ठपूर्ण असून गेली शेकडो वर्षे ते एकाच लाकडी खांबावर उभे आहे. हे बुद्धमंदिर असून येथे जगभरातून पर्यटक व भाविक सतत येत असतात. जमिनीपासून २६० फूट उंचीवर बांधले गेलेले हे मंदिर ११४६ सालातले आहे.

या मंदिरात येऊन मनोभावे प्रार्थना करणार्‍या भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात असा विश्वास आहे. त्यातही ज्यांना मूल नाही व मूल हवे आहे त्यांनी येथे येऊन संतानासाठी प्रार्थना केली तर ती नक्की पूर्ण होते असेही सांगितले जाते. येथे येणार्‍या भाविकांत व पर्यटकांत भगवानाबरोबर ज्या खांबावर ते मंदिर उभे आहे तो पाहण्याचे आकर्षण मोठे आहे. असे सांगतात झुकीया नावाच्या व्यक्तीने त्याच्या आईच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले. गान्लू या नावाचा अर्थ गोड दव असा आहे. या मंदिरात मागच्या पहाडातून वाहणार्‍या झर्‍याचे पाणी टपकत असते व हे पाणी चवीला अगदी दवबिदूंसारखे असून ते औषधी असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment