नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजी मंदिराचे उत्पन्न घटले


तिरुमाला – नोटाबंदीचा परिणाम भाविकांच्या दान क्षमतेवरही झाला असून यामुळे देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मंदिरांपैकी एक तिरुपती बालाजीच्या उत्पन्नात देखील मोठी घट झाली आहे. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी तिरुमला तिरुपति देवस्थान ट्रस्टकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी ट्रस्टकडून भाविकांना देण्यात येणार्‍या प्रसादासह अन्य सुविधांचा दर वाढविण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीपूर्वी तिरुमला तिरुपति देवस्थान ट्रस्टला दररोज 5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यात बँक डिपॉझिट्सचाही समावेश आहे. नोटाबंदीनंतर हे उत्पन्न प्रतीदिवस 1 कोटी रुपयांनी घटले आहे. तिरुमाला ट्रस्टचे चेअरमन चाडलवडा कृष्णमूर्ति म्हणाले, आम्ही भक्तांवर कोणताही अतिरिक्त भार देऊ इच्छित नाही. मात्र, आम्ही मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणार्‍या टिकिटाचे दरात किंचित वाढ करण्याचा विचार करत आहे. यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे.

मंदिरात दर्शनासाठीच्या टिकिटाचे दर 50 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत आहेत. यात जास्त करून भाविक स्पेशल दर्शनासाठीचे 300 रुपयांचे तिकिट घेतात. तसेच दररोज सुमारे 2 हजार भाविक 500 रुपयांचे तिकीट घेऊन व्हीआयपी दर्शन घेतात. तिरुपति ट्रस्टकडून तिकिट दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. ट्रस्टच्या मते, नोटाबंदीनंतर घटलेले उत्पन्नाची भरपाई करता येईल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्रस्टकडून दरवाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तो अस्वीकार केला होता.

Leave a Comment