दुबई : दुबईमध्ये ३६० अंशांमध्ये स्वतःभोवती फिरणारी इमारत बांधली जात असून गिरक्या घेणारी इमारत, असा स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळणार आहे. डुलण्याचा आनंद या इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसांनाही मिळणार आहे. ९० मिनिटांमध्ये ३६० अंशांच्या कोनामध्ये ८० मजल्यांची ही इमारत फिरणार आहे.
गोल गोल फिरणार दुबईमधील ही इमारत
एका मिनिटात जास्तीत जास्त ६ मीटर या इमारतीचा मजला फिरणार आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या सुरक्षेबाबतही काळजी घेतली जाणार आहे. इमारतीचा प्रत्येक मजला रिव्हॉल्व्हिंग ठेवण्यात येणार आहे. जगातली ही पहिली फिरती इमारत दुबईत आहे. वास्तुरचनाकार डेव्हिड फिशर यांनी इमारतीचे स्थापत्य तयार केले आहे. इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम ६ महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून, २०२० पर्यंत संपूर्ण इमारत तयार होणार आहे.
मजबूत सिमेंट बेसच्या माध्यमातून या इमारतीचा प्रत्येक मजला गिरकी घेणार आहे. इमारतीतील रहिवाशांना पर्शियन गल्फ आणि दुबईतील चहूबाजूंकडील दृश्य पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही इमारत विजेचीही निर्मिती करणार असून ती वीज इमारतीतील रहिवाशांना वापरता येणार आहे.