‘या’ गावात मुलगा पसंत केल्यानंतर तुटते लग्न


लखनऊ: उत्तर प्रदेशात एक असे गाव आहे जेथे लोकांचे लग्नच जमत नाही. या गावातील अनेक लोक लग्नाचे वय निघून गेल्यावरही अविवाहितच आहेत. उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊपासून केवळ ८-१ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘बक्शी का तालाब’ जवळ हे गाव आहे.

डिजिटल इंडिया आणि कॅशलेसचे स्वप्न आज आपला देश बघतो आहे, पण दुसरीकडे सोयीसुविधा सोडाच गावात वीज देखील नाही. महत्त्वाचे म्हणजे गावातील अनेक वृद्धांना वीज म्हणजे काय हे देखील माहित नाही. निवडणुकाजवळ आल्या की अनेक नेते गावात येऊन विजेचे आश्वासन देतात, मात्र नंतर ते कधीच दिसत नाही. त्यामुळे यावेळी गावक-यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लग्नासाठी या गावातील लोकांना स्थळ येत नाही असे नाही. गावातील लोकांना स्थळ येतात, गावातील मुलगाही पसंद केला जातो. मात्र जेव्हा मुलीकडच्या लोकांना कळतं की गावात वीज नाही तेव्हा ते मुलीला त्या गावात देण्यास नकार देता. या गावात अनेक मुलांनी चाळीशी गाठली आहे, पण गावात वीज नसल्याने त्यांचे लग्न जमू शकलेले नाही.

या आधी या गावात वीज आणण्याचा प्रयत्न झाला नाही असे नाही. गावातील एक वृद्ध सांगतात की काही वर्षांपुर्वी गावात विजेचे खांब लावण्यात आल्यामुळे गावक-यांना वाटले की आता लवकरच गावात वीज येईल, मात्र त्या खांबावर तार कधी लागल्याच नाही. गावात वीज नसल्याने अनेकांनी आता शहरात राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे एक घर शहरातही आहे. त्यांची लग्न लगेच जमतात, पण अन्य गावकरी मात्र अजूनही अविवाहितच आहेत. तसेच गावातील अनेकांकडे मोबाईल आहे मात्र गावात वीज नसल्याने त्यांना शेजारच्या गावात जाऊन मोबाईल चार्ज करावा लागतो.

Leave a Comment