भूकंपाचे भाकित


आजवर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे फडणवीस सरकारला नोटीस दिली असल्याचे जाहीर करीत होते. नंतर संजय राऊत यांनी आपल्या खास शब्दात लवकरच फडणवीस माजी मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले. या दोघांच्या या वल्गनांवरही ते खरोखरच सत्तेतून बाहेर पडतील असे कोणाला वाटले नव्हते. तसे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेते आता मध्यावधी निवडणुका होणार आणि महाराष्ट्रात पुन्हा आपलीच सत्ता येेणार म्हणून नाचायला लागले होते. पण कालच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वस्तुस्थितीचे भान आले आणि त्यांनी सरकार पाडणे हे किती कटकटीचे आहे याची जाणीव करून दिली. कॉंग्रेसमध्ये जे काही अजूनही विचारी आणि परिपक्व नेते आहेत त्यात चव्हाण यांचा नक्कीच समावेश होतो. शिवसेनेच्या नेत्यांना जे वाटते आणि ते जसा विचार करीत आहेत तसे हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे यांना वाटते की, आपण पाठींबा काढून घेण्याचाच उशीर की, फडणवीस सरळ घरी जाऊन बसणार. पण नंतर पर्यायी सरकार कोणते आणि कसे तयार होणार याची त्यांना कसलीही माहिती नाही.

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे, शिवसेनेचा पाठींबा काढून घेण्याने फडणवीस एकदम माजी मुख्यमंत्री होत नाहीत. त्यासाठी आधी शिवसेनेला आपला पाठींबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांना द्यावे लागेल. फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री करण्याआधी आपल्या सार्‍या मंंत्र्यांना माजी मंत्री करावे लागेल. किंवा आधी सदनातला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अविश्‍वास ठराव दाखल करावा लागेल. त्यावर मतदान होईल. सदनातल्या कोणत्याही पक्षातल्या एकूण २० आमदारांनी मतदानाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला तरी सरकार बहुमताची परीक्षा पास होईल. तेव्हा शिवसेनेने कितीही आव आणला तरीही त्यांच्या म्हणण्यानुसार सार्‍या घटना घडणार नाहीत. महाराष्ट्र विधानसभेतली पक्षनिहाय सदस्य संख्याच अशी काही विचित्र आहे की, सार्‍या गोष्टी शिवसेनेवर अवलंबून नाहीत. शिवसेना फार तर भाजपाचा पाठींबा काढून घेऊ शकते. तेच तेवढे त्यांच्या हातात आहे. फडणवीस यांनी घरी जायचे की नाही हे शिवसेनेच्या हातात नाही. प्रत्येक पक्षातल्या आमदारांच्या ते हातात आहे. काल आदित्य ठाकरे यांनी आता भूकंप होणार अशी घोषणा केली आहे. पण त्यांना भूकंप म्हणजे काय हे नीट माहीत नाही आणि माहीत असले तरीही आपल्याकडे भूकंप घडवण्याची ताकद नाही याचे त्यांना भान नाही. आपण सरकारचा पाठींंबा काढून घ्यायचा म्हणजे मज्जा येईल याच एका भ्रमात ते आहेत.

आजच्या काळात राजकीय पक्षांची अवस्था इतकी बिकट झाली आहे आणि प्रचाराचे तंत्र इतके वेगवान झाले आहे की कोणत्याही पक्षाचे नेते चातुर्यात कमी पडले की, त्यांची टोपी उडवायला सुरूवात होते. बोलताना सावधपणा राखायला हवा, जिभेवर खडीसाखर ठेवायला हवी. पण शिवसेनेच्या नेत्यांना ऐतिहासिक नाटकातल्या पात्रांच्या आविर्भावात बोलण्याची खोड आहे. शिवाय आपण राजकारणात नेहमीच कमांडिंग स्थितीत असतो आणि बाकीचे आपले सारे मित्र हे आपल्या कृपेची भीक मागत असतात. तेव्हा त्यांना टाकून बोलले पाहिजे तरच आपले नेतृत्व सिद्ध होते अशाही भ्रमात ते बोलत असतात. खरे तर आज शिवसेनेला सत्तेत राहण्याची गरज आहे. त्यांनी सत्ता सोडली तर पक्षाला गळती लागेल हे त्यांना कळते पण नम्रपणे बोलणे आणि वागणे हे आपल्या शिवनीतीला सोडून आहे असे त्यांना वाटते. म्हणून ते सतत आक्रमकपणाने बोलत असतात. त्यातून शत्रू निर्माण करून ठेवतात. आता त्यांना उद्धव ठाकरे यांची मालमत्ता जाहीर करण्याचे आव्हान दिले गेले आहे. ती गोष्ट त्यांना सोयीची नाही. पण त्यांनी हे संकट आपल्या बोलण्यातून आणि अरेरावीच्या भाषेतून ओढवून घेतले आहे.

कोणावरही टीका करताना संयमाने केली तर आणि ती पुराव्यासह, सप्रमाण केली तर ती अंगलट येत नाही. भाजपाने गुंड जमा केले आहेत असे म्हणून सेनेने भाजपाची प्रतिमा खराब करण्याचा डाव टाकला. तो अनावश्यक आहे. आताच्या स्थितीत कोणत्याही पक्षात आपल्या प्रतिस्पर्ध्याची संपत्ती आणि गुंडगिरी यांच्यावरून आव्हान देण्याची नैतिक हिंमत राहिलेली नाही. कारण सगळ्यांचीच घरे काचेची आहेत. आता भाजपाने नावे आणि आकडेवारीसह या बाबत शिवसेनाच कशी अव्वल आहे हे जाहीर केले आहे. असेच उद्धव ठाकरे यांनी काही कारण नसताना किरीट सोमैय्या यांना दुखवून ठेवले. आता सोमैय्या तर त्यांच्या मागेच लागले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना भ्रष्टाचाराच्या बाबतीत आव्हान दिले आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांनीही ठाकरे टक्केवारी घेत असल्याचे सूचित केले आहे. शिवसेनेला भाजपाशी जमवून घ्यायचे नसेल तर तिने आपली वेगळी चूल मांडावी पण विनाकारण राजकारणात अडचणीची होतील अशी विघ्ने ओढवून घेऊ नयेत. राजकीय पक्ष चालवण्यासाठी लागतो तो मुत्सद्दीपणा त्यांच्याकडे नाही. त्यांना सरकारचा पाठींबा काढून घ्यायचा असेल तर तो त्यांनी जरूर काढून घ्यावा पण त्या बाबतीत आपले हसे होऊ नये याबाबत दक्षता बाळगावी. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हेही गेली १५ वर्षे असे भांडतच नांदले पण कोणी कोणाला सरकार पाडण्याबाबत इशारे दिले नाहीत. त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखे आहे.

Leave a Comment