प्रेमी युगलांचे मसीहा लव्ह कमांडो


मानापमानाच्या खोट्या कल्पना, उच्चनीचतेच्या बेड्या तसेच जातीधर्माचे अडसर यामुळे अनेक प्रेमी युगलांना एकत्र येण्यासाठी अनेक दिव्ये पार करावी लागतात. त्यातून ऑनर किलिंगसारखे प्रकारही नित्याचेच. १८ वर्षाचा तरूण देशाचा पंतप्रधान निवडू शकतो तर आपला जोडीदार का निवडू शकत नाही या विचाराने एकत्र आलेले काही समाजसेवक, वकील, पत्रकार, प्राध्यापक, अभिनेते, मानवाधिकार कार्यकर्ते, विद्यार्थी यांचा एक गट अशा प्रेमी युगलांसाठी मदतीचा हात पुढे करून उभा राहिला आहे. प्रेम करणे पाप नाही या भावनेतून प्रेमी युगलांच्या मदतीसाठी सज्ज झालेल्या या गटाला लव्ह कमांडो म्हणून ओळखले जाते.

या गटाने त्यांचे कार्य ७ जुलै २०१० साली सुरू केले व पहिल्याच वर्षात शेकडोंनी तर आत्तापर्यंत सहा वर्षात ४० हजार हून अधिक प्रेमींना एकत्र आणून त्यांची लग्नगाठ बांधून दिली आहे. हेल्पलाईनवरून या गटाचे काम सुरू आहे व भारतातील १२ शहरात त्यांनी ठिकठिकाणी शेल्टर्स सुरू केली आहेत. येथे घरच्यांचा विरोध पत्करून आलेल्या, पळून आलेल्या युगलांना मोफत राहणे, जेवणाची सोय दिली जाते, सुरक्षा दिली जाते व कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचे विवाह लावून दिले जातात. या कामी अनेक पंडित पुरोहितांनी या गटाला मदतीचा हात दिला आहे. हा गट प्रेमींना केवळ कुटुंबापासून संरक्षण देतो असे नाही तर ऑनरकिलिंगपासूनही संरक्षण देतो. अनेकदा अल्पवयीन मुले येथे येतात तेव्हा त्यांना सज्ञान होईपर्यंत वाट पाहण्याचा योग्य सल्ला देऊन त्यांची घरी पाठवणी केली जाते तसेच कुटुंबियांचीही समजूत घातली जाते.

सुरवातीला या गटात २०० सदस्य होते त्यांची संख्या आता लाखोंवर गेली असून देशविदेशातून सगळीकडे ही मदत दिली जाते. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मल्होत्रा हे मुख्य संयोजक आहेत. ते सांगतात आम्ही प्रसिद्धी व चर्चेपासून दूर राहून हे काम करतो. जोडप्यांची माहितीही बाहेर देत नाही कारण त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतोच पण समाजातील कांही गटही आमच्या या कार्याच्या विरोधात आहेत. आमचे दोन हेल्पलाईन नंबर आहेत व त्यावर सतत फोन येत राहतात. दिल्लीतच आमची सात शेल्टर्स आहेत मात्र कांही लोकांच्या विरोधामुळे त्यांच्या जागा सतत बदलत्या ठेवल्या जातात.

Leave a Comment