लाल शाहबाज कलंदर दर्ग्यात स्फोट-१०० ठार


पाकिस्तानच्या सेहवन शहरातील प्रसिद्ध लाल शाहबाज कलंदर या सुफी संताच्या दर्ग्यावर गुरूवारी सायंकाळी घडवून आणल्या गेलेल्या आत्मघाती स्फोटात किमान १०० जण ठार तर २५० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली आहे. जखमींवर उपचारासाठी परिसरातील सर्व रूग्णालयात आणीबाणी जाहीर केली गेली असून पंतप्रधान नवाझ शरीफ व सिंध प्रांतांचे मुख्यमंत्री मुराद अलीशाह यांनी या भेकड हल्याची निंदा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दर्ग्यात गुरूवारी भक्तांची प्रचंड गर्दी असते. ही संधी साधून गोल्डन गेटमधून आत शिरलेल्या हल्लेखोराने अंगावरील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. हल्लेखोर महिला असल्याचा संशय असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दर्गा परिसराच्या जवळ हॉस्पिटल्स नाहीत तसेच वस्तीही खूप नाही. त्यामुळे हल्ल्यानंतर पोलिस पोहोचण्यासही विलंब झाला अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागले.

लाल शाहबाज हे सुफी संत ११७७ साली जन्मले व त्यांचा मृत्यू १२७५ साली झाला. ते लाल रंगाचा पोशाख घालत असत म्हणून त्यांना लाल शाहबाज हे नांव मिळाले होते. कलंदर याचा अर्थ फकीर. त्यांना झूलेलाल कलंदर असेही म्हटले जात असे. १३५६ साली त्यांच्या दर्ग्याला मोठे स्वरूप दिले गेले. इराणच्या शाहने या दर्ग्यासाठी सोन्याचा दरवाजा दिला होता व त्याला गोल्डन गेट म्हणतात. दमादम मस्त कलंदर हे काव्य प्रसिद्ध कवी आमीर खस्त्रो यांनी याच सूफी संतांवर लिहिले होते.