रघुराम राजन यांच्या काळातच दोन हजारांच्या नोटांची छपाई


मुंबई – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याच काळात पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नव्याने चलनात आणलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटेची छपाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उर्जित पटेल यांची दोन हजारांच्या नोटांवर स्वाक्षरी असली तरी त्या राजन यांच्याच काळात छापल्या होत्या, असे वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. गव्हर्नरपदासाठी उर्जित पटेल यांच्या नावाची घोषणा सरकारकडून करण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे काम हाती घेण्यात आले होते.

याबाबत या नोटांची छपाई करण्यात आलेल्या दोन छपाईखान्यांतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्टपासून दोन हजाराच्या नोटा छापण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात करण्यात आली. मात्र, रघुराम राजन यांनी ४ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदाचा पदभार सोडला होता. त्यामुळे या नोटांवर राजन यांची स्वाक्षरी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाला ई-मेलद्वारे ‘हिंदुस्थान टाईम्स’कडून प्रश्न विचारण्यात आले होते. दोन हजारांच्या नोटा छापण्यासंदर्भातील निर्णयप्रक्रियेत राजन यांचा सहभाग होता का, या नोटांवर त्यांची स्वाक्षरी का नाही, अशा प्रश्नांचा त्यामध्ये समावेश होता. परंतू, रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयाने या प्रश्नांना उत्तर देणे टाळले आहे.

Leave a Comment