मुंबईला जाताय? चोरबाजाराचा फेरफटका कराच.


चोरी सामानाची विक्री करणारे ते चोर बाजार. केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक शहरात असे चोरबाजार आहेत. व त्यात खरेदी करणार्‍यांत चोरच नसतात तर अगदी सज्जन माणसेही येथे खरेदीची मजा लुटतात. मुंबईच्या प्रतिष्ठीत दक्षिण मुंबई भागातील मोहम्मद अली रोड येथे १५० वर्षे जुना चोरबाजार आहे व येथे चपलापासून मोबाईल पर्यंत तसेच ऑटो पार्टपासून अख्या मोटारींपर्यंत अनेक वस्तू मिळतात. चोरीच्या गाड्या येथे मॉडिफाय करून विकल्या जातात. या बाजारात गाडी अथवा स्कूटर पार्क करताना आपल्याच गाडीचे स्पेअर पार्ट येथल्या दुकानातून विकत घेण्याची पाळीही येऊ शकते व मालाचे पैसे मोजताना खिसा कापला गेल्याचेही लक्षात येऊ शकते.

असे सांगतात की हा मुळचा शोर बाजार होता. म्हणजे येथील विक्रेते जोरजोरात ओरडून वस्तू विकत असत. पण ब्रिटीशांच्या इंग्रजी अॅक्सेंटमुळे शोरचा उच्चार चोर झाला व चोरबाजार असेच नांव प्रसिद्ध झाले. येथे ऑटो पार्ट, कपडे, घडयाळे, बनावट ब्रँड च्या वस्तू, विंटेज, अँटिक्स सजावट सामान अशी कुठलीही वस्तू मिळते. सकाळी ११ वाजता येथील दुकाने उघडतात ती सायंकाळी साडेसातला बंद होतात. शुक्रवारी दुकाने बंद अ्रसतात मात्र खरा चोरबाजार याच दिवशी भरतो. त्याला जुम्मा मार्केट असे म्हटले जाते. हा बाजार सूर्योदयाला भरतो. या बाजारात खरेदी करताना बार्गेनींगचे कौशल्य पणाला लागते.

असे सांगतात की राणी व्हिक्टोरिया मुंबई दौरा संपवून परत जात असताना जहाजावर चढविण्यावेळी तिचे सामान चोरीला गेले ते या चोरबाजारात मिळाले. येथे विविध वस्तूंबरोबरच लाजवाब कबाबही मिळतात. अरूंद रस्ते, प्रचंड गर्दी व एकाला एक लागून असलेल्या इमारतींच्या जंजाळातून फिरताना घमघमणारा कबाबचा दरवळ तुम्हाला अचूक रेस्टॉरंटच्या दाराशी घेऊन जातो. खिशात पैश्यासह पाकीट जागेवर असेल तर या कबाब चा लुफ्त लुटता येईल.

Leave a Comment