आता बँकेत मिळणार रेल्वे तिकिट


मुंबई – रेल्वे प्रशासनाने तिकिटासाठी लागणा-या लांब रांगाची कटकट संपवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असून आता लवकरच बँकेतही रेल्वे तिकीट मिळणार आहे. एप्रिल २०१६ पासून यादृष्टीने काम करण्यास रेल्वे बोर्डाने सुरुवात केली असून, प्रवाशांना जनरल तिकीट बँकेतच उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी रेल्वे स्टेट बँक ऑफ इंडियाशी चर्चा करत आहे.

ही योजना एप्रिल २०१७ पर्यंत सुरु होईल असा अंदाज असून त्यानंतर ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. या नव्या उपक्रमासाठी बँक दोन पर्यायांचा विचार करत आहे. एकतर बँकेच्या परिसरात वेंडिंग मशिन बसवण्यात यावी, जिथून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होऊ शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे एटीएममध्ये काही बदल करुन त्याला रेल्वे तिकीट वाटप यंत्रणेशी जोडणे. यामुळे रेल्वे तिकीट मिळणे खूप सोपे होईल असे रेल्वेचे म्हणणे आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटरवर येणारा भार कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी तर बस स्टँड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणांवरुन रेल्वे तिकीट विक्री आधीच सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment