स्मार्टफोन विक्रीत अॅपल अव्वल


जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंगला मागे टाकत अॅपलने अव्वल स्थान काबीज केले असून अॅपलने सॅमसंगला दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच मागे टाकले आहे. ७ कोटी ७० लाख ४ हजार स्मार्टफोनची अॅपलने चौथ्या तिमाहीमध्ये विक्री केली आहे. तर गेल्या तिमाहीत सॅमसंगने ७ कोटी ६७ लाख ८ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. याबद्दलची आकडेवारी गार्टनर या संशोधन संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

जगभरातील स्मार्टफोन बाजारपेठेचा १७.९% हिस्सा सध्या अॅपलकडून नियंत्रित केला जातो. तर सॅमसंगचा स्मार्टफोन बाजारपेठेतील हिस्सा १७.८% इतका आहे. त्यामुळे स्मार्टफोन बाजारपेठ नियंत्रित करण्यासाठी अॅपल आणि सॅमसंगमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा असल्याचे दिसते आहे. अॅपल आणि सॅमसंगने विक्री केलेल्या स्मार्टफोनच्या संख्येतील फरक अतिशय कमी आहे. अॅपलने सॅमसंगपेक्षा २ लाख ५६ हजार अधिक स्मार्टफोन विकले आहेत. विशेष म्हणजे सॅमसंग आणि अॅपल या दोन बलाढ्य कंपन्यांमध्ये पहिल्यांदाच इतक्या अटीतटीची स्पर्धा होताना दिसते आहे.

गॅलेक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येचा फटका सॅमसंगला सहन करावा लागला आहे. यासोबतच कमी आणि मध्यम किमतीच्या स्मार्टफोन विभागात सॅमसंगला हुवाई, ओप्पो, बीबीकेसह जिओनीकडून जोरदार टक्कर मिळते आहे. याचा परिणाम सॅमसंगच्या विक्रीवर झाला आहे. ४ कोटींहून अधिक स्मार्टफोनची विक्री करत हुवाईने सॅमसंग आणि अॅपलला काही प्रमाणात धक्का दिला आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत हुवाईने अॅपल आणि सॅमसंगनंतर तिसरे स्थान पटकावले आहे.

Leave a Comment