विदेशी पर्यटकांना मिळणार विमानतळावरच सिम कार्ड


नवी दिल्ली – विदेशी पर्यटकांना भारतात प्रवेश करताच भारत सरकारकडून एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ई-व्हिजावर भारतात येणार्‍या पर्यटकास सरकारकडून एक वेलकम किट उपलब्ध करून देण्यात येईल. या किटमध्ये विविध माहितींसह एक सिम कार्डही असणार आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच संस्कृति व पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. या सिम कार्डमध्ये 50 रुपयांचा टॉक टाईम आणि 50 एमबी डाटा मोफत देण्यात येणार आहे.

संस्कृति आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा म्हणाले, ही योजना सुरू करण्याचा उद्देश असा आहे की, भारतात येणार्‍या विदेशी पर्यटकांना आपल्या कुटुंबियांशी आणि आपल्या मित्रांशी सतत संपर्क ठेवून आपली खुशाली देता येऊ शकेल. तसेच टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स् ऑपरेटरपासून टॅक्सी, हॉटेलमध्ये संपर्क साधता येईल. या सुविधामुळे लोकल सिम घेण्यासाठी व्यर्थ जाणारा 2-3 तासांचा वेळ वाचणार आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी विदेशी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टुरिस्ट हेल्पलाईन सेवेचाही लाभ घेता येणार आहे. ही टुरिस्ट हेल्पलाईन 24 तास सेवा देत असून सध्या 12 आंतरराष्ट्रीय भाषेत उपलब्ध आहे. यात इंग्रजीसह रशियन, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जपानी आणि अरबी यासारख्या भाषांचा समावेश आहे.

ही सेवा देशाची राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध असणार आहे. तसेच पुढील काही दिवसांत देशातील अन्य 15 आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, जेथे ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा व्हीएसएनएलच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एक विशेष काऊंटर असणार असून पर्यटकांना ई-व्हिसा आणि पासपोर्टच्या पहिल्या पानाची एक झेरॉक्स दिल्यावर फ्री सिम देण्यात येणार आहे. भारतात सध्या 161 देशांसाठी ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Comment