येथे आहे वेताळाची गुहा


विविधतेतून एकता साधणार्‍या भारतात अनेक ठिकाणी चमत्कृतीपूर्ण रहस्यमय स्थळे विखुरलेली आहेत. या सार्‍या ठिकाणी भेट द्यायची म्हटले तर कदाचित एक आयुष्य पुरे पडणार नाही. जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत अशी अनेक आश्वर्ये भारतात पाहायला मिळतील. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सुंदरनगर जवळ अशीच एक चमत्कारी गुहा आहे. याला वेताळाची गुहा असे म्हणतात. या गुहेत जाऊन प्रार्थना केली की खास इच्छा हमखास पूर्ण होतात असाही समज आहे. या गुहेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात.

या गुहेच्या भिंतीतून अस्सल देसी घी पाझरते व त्याचा वापर खाण्यासाठी केला जातो असेही सांगितले जाते. ४० ते ५० फूट लांबीच्या या गुहेची उंची १५ फूट आहे. येथे प्राचीन हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. त्यांची नित्य पूजाअर्चा केली जाते. गुहेत एक झुळझुळता झराही असून त्यातून मधुर संगीत ऐकू येते.

असे सांगितले जाते की या भागात कुणाही घरी लग्नकार्य निघाले की यजमान या गुहेशी कुंकू अक्षत घेऊन येत असे व कुंकु लावून लग्नाचे निमंत्रण करत असे. त्याचबरोबर पाहुण्याराउळ्यांसाठी कमी पडणारी भांडी येथे येऊन यजमान मागत असत व हव्या असलेल्या भांड्याची यादी गुहेच्या भिंतीवर लावत असत. दुसरे दिवशी ती भांडी गुहेच्या तोंडाशी ठेवलेली दिसत. घरचे कार्य संपले की पुन्हा भांडी गुहेच्या तोंडाशी ठेवायची ती आपोआप नाहिशी होत असत. मात्र कुणीतरी अशी भांडी नेली ती परत आणून दिली नाहीत व तेव्हापासून कुणालाच भांडी मिळत नाहीत.

येथील भिंतींवरूनही देसी घी वाहत असे. कुणीही यावे व आपल्या कोरड्या भाकरीवर तूप घेऊन खावे अशी पद्धत होती. मात्र येथेही कुणीतरी उष्टी भाकरीच भिंतीवर लावल्याने ते तूप उष्टे झाले व भिंतीवरून वाहायचे थांबले असेही येथील स्थानिक सांगतात. यात अंधश्रद्धेचा भाग किती कोण जाणे. मात्र तरीही या गुहेला भेट द्यावी किमान हिमाचल चे सौंदर्य तरी नजरेत भरून घेता येते.

Leave a Comment