इंटरनेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या गुगल कंपनीत काम करणे हे प्रत्येक संगणक अभियंत्याचे स्वप्न असते. एका चिमुरडीनेही आपले हे स्वप्न पत्राद्वारे कळवले, तेव्हा गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनाही राहवले नाही. या मुलीला शुभेच्छा देतानाच नोकरीसाठी तुझ्या अर्जाची वाट पाहतोय, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
नोकरीसाठी तुझ्या अर्जाची वाट पाहीन – सुंदर पिचाईचे चिमुरडीला पत्र
इंग्लंडमधील सात वर्षे वयाच्या क्लो ब्रिजवॉटर या मुलीने मला गुगलमध्ये काम करायची इच्छा आहे, असे पत्र गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना पाठवले होते. ‘गुगलबॉस’ असा तिने या पत्रात पिचाई यांचा उल्लेख केला आहे. “माझ्याकडे टॅब्लेट असून मी त्याच्यावर गेम खेळते. मला कम्प्युटरची आवड आहे. तसेच रोबोट आणि किंडल फायरचीही आवड आहे. मी मोठी झाल्यावर मला गुगलमध्ये काम करायची इच्छा आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पोहण्याची इच्छा आहे,” असे तिने पत्रात लिहिले आहे.
यावर उत्तर देऊनसुंदर पिचाई यांनी क्लोला उत्तेजन देऊ केले आहे. “प्रिय क्लो, तुझ्या पत्रासाठी मी खूप खूप आभारी आहे. तुला संगणक आणि यंत्रमानवांची आवड आहे, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे, की तू तंत्रज्ञानशिकणे चालू ठेवशील. तू कष्ट करत राहशील आणि स्वप्नांचा पाठपुरावत करत राहशील, तर तुझ्या मनात असलेल्या – गुगलमध्ये काम करण्यापासून ऑलिम्पिकमध्ये पोहण्यापर्यंत – सर्व गोष्टी तू साध्य करू शकशील, असे मला वाटते. तुझे शिक्षण पूर्ण होऊन तुझा नोकरीचा अर्ज मिळण्याची मी पाट पाहीन! तुला आणि तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा,” असे पिचाई यांनी लिहिले आहे.
क्लोचे वडील अँडी ब्रिजवॉटर यांनी लिंक्डइन या संकेतस्थळावरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली व पत्रही मांडले. त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.