अखेर शशिकलाची सरशी


चिन्नमा शशिकला यांना न्यायालयीन लढाईत हार पत्करून चार वर्षांसाठी तुरुंगात जावे लागले असले तरीही त्यांनी पक्षांतर्गत लढाईत ओ.पी. एस. अर्थात ओ पेनीरसेल्वम यांच्यावर मात केली असून आपल्या पसंतीच्या ई. पलानीस्वामी यांना अण्णाद्रमुकचे विधीमंडळ नेते म्हणून निवडून आणण्यात यश मिळवले आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथही दिली आहे. त्यांच्यासोबत ३० मंत्र्यांनीही शपथ घेतली असून आता तामिळनाडूत पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करणार हे नक्की झाले आहे. शशिकला यांनी तुरुंगात जाता जाता आपल्या पसंतीच्या उमेदवाराला सत्तेवर बसवण्यात यश मिळवले आहे. ओ. पनीरसेल्वम हे जसे जयललिता यांच्यावर निष्ठा असलेले नेते आहेत तसेच पलानीस्वामी हेही जयानिष्ठ नेते म्हणून प्रदीर्घकाळ काम करीत आले आहेत.

हे दोघेही जया निष्ठ असले तरीही पलानीस्वामी हे चिन्नमा निष्ठ आहेत आणि त्याचेच बक्षिस म्हणून त्यांना हे पद मिळाले आहे. अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ११९ आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आणि आपले नेते म्हणून त्यांची निवड केली. त्यामुळे राज्यपालांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून नेमणे भाग पडले. त्यांनी फार विलंब न लावता त्यांना शपथही दिली. पलानीस्वामी हे गौडर समाजाचे आहेत आणि त्यांनी १९८४ पासून जयललिता यांचे समर्थन केलेले आहे. ज्या काळात अण्णाद्रमुकच्या अनेक कार्यकर्त्यांनी जयललिता यांना आपला नेता म्हणून कधीच मानले नव्हते तेव्हापासून ते जयललिता यांच्या मागे उभे आहेत.

त्यांना १९८९ साली प्रथम विधासभेचे तिकिट मिळाले आणि ते प्रथमच आमदार झाले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली पण ते प्रत्येक वेळी निवडून आले नाहीत. जयललिता यांनी त्यांना तीनदा लोकसभंचीही उमेदवारी दिली पण ते एकदाच लोकसभेवर निवडून आले. आता आता ते निवडून आले आहेत आणि मंत्रिमंडळातही आहेत. त्यांच्याकडे एक अनुभवी नेता म्हणून पाहिले जाते पण त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी समोर आलेली उमेदवारी अनेक आमदारांसाठी अनपेक्षित होती. त्यांच्या इडाप्पडी जिल्ह्यातल्या अण्णा द्रमुकच्याही काही आमदारांनी आताच उघडपणे ते मुख्यमंत्रीपदाला लायक नाहीत अशी जाहीर तक्रार केली आहे पण शशिकला यांना असाच मुख्यमंत्री हवा होता. लायक नसणे हीच त्यांची खरी पात्रता आहे.

Leave a Comment