जयपूरमध्ये व्हर्टिकल शेतीचा प्रयोग यशस्वी


घरांच्या छतांचा, इमारतीच्या छतांचा अथवा सोसायटीतील मोकळ्या जागांचा सदुपयोग करून व्हर्टिकल पद्धतीने सेंद्रीय शेती करण्याचा प्रयोग जयपूर मध्ये यशस्वी झाला आहे. खासगी विद्यापीठ व कृषी केंद्र तज्ञांच्या परस्पर सहकार्यातून ही किमया साधली गेली आहे. त्यासाठी १ वर्षभर प्रयोग व संशोधन सुरू होते व त्याचे फारच चांगले परिणाम दिसून आले असल्याचे कृषीतज्ञ अभिषेक शर्मा यांनी सांगितले.

ते म्हणाले यात आपल्यासाठी उपयुक्त असलेला भाजीपाला, फळे, फळभाज्या पिकविता येतात. या शेतीसाठी मातीची गरज नाही व अगदी कमी पाण्यावर ती फुलविता येते. त्यासाठी कडक उन्हाचीही गरज नाही. जयपूरमधील प्रयोगात कोबी, टोमॅटो, लेट्यूस, ब्रोकोली, अशा अनेक भाज्या पिकविण्यात यश आले आहे. हायड्रोपोनिक तंत्राने कमी पाण्यात व मातीशिवाय ही पिके घेता येतात. ही पिके पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकविली असल्याने त्यावर रोग पडत नाहीत व चांगल्या दरांना त्याची विक्री होऊ शकते.

या बहुमजली इमारतींची छपरे, सोसायटीतल्या मोकळ्या जागा, घराची गच्ची येथे कमरेएवढया उंचीची स्ट्रक्चर बनवून त्यात ट्रेसारखी व्यवस्था केली जाते. अगदी तळात पाण्याची टाकी बसविली जाते व त्यातून पंपाने अगदी कमी प्रमाणात पाणी दिले जाते. हे पाणी अगोदरच पोषक तत्त्वे घालून बनविले जाते. एलईडी बल्बच्या सहाय्याने पिकांना उष्णता दिली जाते. ही शेती छतावर करायची असेल तर तापमान नियंत्रणाची सेाय करावी लागते.

Leave a Comment