नशामुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी राबवली अनोखी मोहिम

एका मिनिटात ७, ७३० कागदाची विमाने उडवून रचला विश्वविक्रम

एका मिनिटांच्या कालावधीत कागदाची ७ हजार ७३० विमाने आकाशात उडवून हिमाचल प्रदेशमधील मोगीनंद उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी नवा विश्वविक्रम रचला आहे. या शाळेतल्या स्काऊट आणि गाईडच्या ८० विद्यार्थ्यांनी मिळून हा विश्वविक्रम साधला आहे.

अमंली पदार्थांच्या आहारी राज्यातील तरूण गेले आहेत आणि या शाळेने नोव्हेंबर २०१६ पासून या तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेची आज सांगता झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थी एकत्र जमले होते. कागदाच्या विमानावर त्यांनी अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी काही संदेश लिहिले होते. ‘मत करो नशा न होगी दुर्दशा’, ‘नशे की आदत मौंत को दावत’ असे अनेक संदेश या विद्यार्थ्यांनी विमानावर लिहिले होते. अशी सात हजारांहूनही अधिक विमाने त्यांनी एका मिनिटांत आकाशात सोडली. या विद्यार्थांनी न्यूझीलंडच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विक्रम मोडीत काढला. ८७ मुलांच्या तुकडीने एका मिनिटांत ३ हजार ६२२ कागदाची विमाने आकाशात उडवली होती. १४ नोव्हेंबर २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशमधल्या शाळेने अमली पदार्थ विरोधी मोहिम सुरु केली होती. पण याचबरोबर तंबाखू विरोधी मोहिमही या शाळेतील मुलांनी राबवली होती.