फळे नैराश्यावर गुणकारी


फळांच्या आणि भाज्यांच्या उपयोगाबाबत आजवर बरेच काही सांगण्यात आले आहे. पण आता फळांचा आणि भाज्यांचा एक फार मोठा फायदा समोर आला असून नैराश्या सारख्या मानसिक आजारावर फळांचे सेवन उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. शारीरिक व्याधीवर फळे गुणकारी ठरतात हे माहीत होते पण त्यांचा मानसिक व्याधीवरही गुण येतो हे नव्याने कळले आहे. नैसर्गिकरित्या वाढवलेल्या आणि पिकवलेल्या फळांच्या सेवनामुळे नैराश्याची व्याधी बरी होते असे संशोधनांती सिद्ध झाले आहे. तीही दोन आठवड्यात होते असा संशोधकांचा दावा आहे. ओटॅगो विद्यापीठातल्या संशोधकांनी १८ ते २५ वर्षे वयोगटातल्या १७१ लोकांच्या आहारावर बारकाईने लक्ष ठेवून आणि त्यांच्या नोेंदी ठेवून हा दावा त्यांनी केला आहे.

हे निरीक्षण दोन आठवडे करण्यात आलेे. या लोकांना तीन गटांत विभागण्यात आले. एका गटातले लोक केवळ सामान्य आहार घेत होते. तर दुसर्‍या गटाला फलाहार वाढवण्यात आला होता. त्यांना दिवसातून एकदा फलाहार घेण्यास सांगण्यात आले होते. तिसर्‍या गटातल्या लोकांना मात्र जाणीवपूर्वक दोन वेळा फळे देेण्यात आली होती. त्यात गाजर, किवी फ्रुट, सफरचंद आणि संत्र्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. आता या तीन गटांचे मानसशास्त्रीय वर्तन तपासण्यात आले. तेव्हा तिसर्‍या गटातले लोक मानसिकदृष्ट्या समतोल साधलेले आणि स्वयंप्रेरित असल्याचे दिसले. त्यांचा जोम आणि प्रेरणा यांत फलाहार सुरू करण्यापूर्वीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून आले.

ज्यांना मर्यादित फलाहार देण्यात आला होता त्यांच्या वर्तनात असा काही फरक दिसून आला नाही. नोंदण्यात आलेला हा फरकही कच्च्या आणि ताज्या फळांच्या तसेच भाज्यांच्या बाबतीतच दिसून आला. शिवाय ज्यांना शिजवलेल्या भाज्या खायला घातल्या त्यांच्यात तसा फार फरक आढळला नाही. हे निरनिराळे निष्कर्ष एका मासिकात प्रकाशित करण्यात आले आहेत. हा सारा अभ्यास डॉ. तमलीन कॉर्नर यांनी केला आहे. त्यांनी अशी शिफारस केली आहे की, वसतिगृहात राहणारे लोक, विद्यार्थी, रुग्णालयातले रुग्ण, विविध कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांनी नित्य नियमाने फळे दिली आणि त्यांना कच्च्या भाज्या खाण्यास प्रोत्साहित केले तर ते आपली कामे चांगली करू शकतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment