एप्रिलमध्ये चीन पाठवणार मालवाहू अंतराळयान


येत्या एप्रिल महिन्यापर्यंत आपले पहिले मालवाहू अंतराळयान पाठवण्याची चीनची योजना आहे, अशी माहिती चायना मॅन्ड स्पेस एजन्सीच्या (सीएमएसए) सूत्रांनी दिली. तियानझू-1 असे या मालवाहू अंतराळयानाचे नाव असून सोमवारी ते चाचणीसाठी दक्षिण चीनच्या हैनान प्रांतातील वेनचांग अंतराळ केंद्रात आले. लाँग मार्च-7 वाय2 या रॉकेटच्या माध्यमातून ते अंतराळात पाठवण्यात येईल.

वर्ष 2020 पर्यंत अंतराळस्थानक बांधण्यासाठी तियानझू-1 हे चीनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण अंतराळस्थानकावरील अंतराळवीरांना गरजेचे सामान पोचविण्यासाठी मालवाहू अंतराळयान आवश्यक असतात.

तियानझू-1 या यानात एक मालवाहू कुपी (कॅप्सूल) आणि एक प्रॉपेलंट कुपी आहे. चीनने स्वतंत्ररीत्या विकसित केलेले ते पहिले मालवाहू अंतराळयान आहे. या यानाचे वजन 13 टन असून त्यातील 13 टन हे सहा टन हे पेलोड आहे. ते तीन महिन्यांपर्यंत अंतराळात राहू शकते. चीनच्या तियानगाँग-2 या अंतराळातील प्रयोगशाळेला जोडले जाण्याची क्षमता या यानात आहे. प्रयोग व चाचण्या करण्याबरोबरच इंधन पुनर्भरण करण्याचीही त्यात क्षमता आहे. लाँग मार्च-7 वाय2 हे रॉकेट प्रक्षेपण केंद्रात मार्च महिन्यांपर्यंत येईल, अशी माहिती सीएमएसएने झिन्हुआ या वृत्तसंस्थेला दिली.

Leave a Comment