हे झाड देते तुम्हाला तुमची व्हॅलेंटाईन


आज व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मात्र अनेकांना अजूनही त्यांची व्हॅलेंटाईन सापडलेली नसेल व त्यामुळे ते निराश झाले असतील. थांबा. हे वाचा. तुमच्या निराशेवर येथे नक्की मार्ग मिळू शकेल. फक्त त्यासाठी दिल्लीवारी करावी लागेल व तीही आजच. दिल्लीतील एक चमत्कारी झाड तुमची व्हॅलेंटाईन मिळण्याची इच्छा पूर्ण करू शकते.

याला अंधविश्वास म्हणा अथवा आणखी कांही. पण दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील एक झाड यासाठी प्रसिद्ध आहे. व्हेलटाईन डेला या झाडाची पूजा मनोभावे केली तर झाड पूजा करणार्‍याची इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. या झाडाला लव्हर्स पॉईंट असेही नांव असून व्हर्जिन ट्री अशीही त्याची ओळख आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीला या झाडावर एखादया बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो दमदमी माता म्हणून लावला जातो. लाल रंगाचे हार्ट शेपचे पाण्याने भरलेले फुगे व पाण्याने भरलेले कंडोम लावून झाड सजविले जाते. असे म्हणतात की या दमदमी माईची पूजा करून प्रसाद घेतला की गर्लफ्रेंड मिळतेच. २०१४ साली दीपिका पदुकोण दमदमी माई होती तर २०१५ मध्ये लिसा हेडनला हा मान मिळाला होता.

कॉलेज प्रशासनाने हे झाड तोडण्याचा निर्णय घेतला होता व त्यासाठी नवीन कार्यालय या जागेवर बांधायचे असल्याचे कारण दिले होते मात्र त्याविरोधात हॉस्टेल व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. अखेर झाडाच्या कांही फांद्या कापण्यावर तडजोड झाली असेही समजते. झाड पूजेत फक्त मुलेच नाही तर मुलीही आघाडीवर असतात. त्याही व्हेलेंटाईन डेला दमदमी माईची पूजा करून चांगला बॉयफ्रेंड मिळावा म्हणून प्रार्थना करतात असेही समजते.

Leave a Comment