बिघडलेले विद्यार्थी


एका मराठी दैनिकाने महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या बदललेल्या मनःस्थितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दैनिकाच्या हाती धक्कादायक निष्कर्ष आले. आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना लहान समजतो. ती निष्पाप असतात असे आपण मानतो. त्यांना बालमानसशास्त्रज्ञ चिखलाच्या ओल्या गोळ्याची उपमा देतात. चिखलाचा ओला गोळा स्वतःचा असा आकार बाळगून नसतो. त्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. तसेच या मुलांच्या बाबतीत समजले जाते. या मुलांचे स्वतःचे असे काही व्यक्तिमत्त्व नसते. त्यांचे व्यक्तिमत्त्व शाळेमध्ये आणि घरी तयार होत असते अशी आपली धारणा आहे. मात्र दैनिकाच्या सर्व्हेक्षणामध्ये हे ओले गोळे म्हणावे तेवढे कच्चे नसल्याचे दिसून आले. यातल्या बर्‍याचशा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व तयार झाले आहे आणि त्याला अपघाताने किंवा योगायोगाने स्वतःचा असा एक आकार आलेला आहे. मात्र तो भयावह आहे अशी चिंता या निष्कर्षाअंती व्यक्त करण्यात आली आहे. ही चिंता सार्थ आहे. परंतु तिचे नीट विश्‍लेषण केल्याशिवाय या परिस्थितीतून बदल करण्याचा मार्ग सापडणार नाही.

आपण ज्या काळात चिखलाच्या ओल्या गोळ्याची उपमा वापरत होतो तो काळ फार मागे गेलेला आहे. जमाना बदलला आहे असे म्हणण्याची एक पध्दत आहे. परंतु या उक्तीतील जमाना म्हणजे फार मोठा कालखंड असतो. जमाना या शब्दाने एक-दोन पिढ्या सूचित होत असतात आणि प्रत्येक पिढी बदलत्या तंत्रज्ञानाच्या, ज्ञानाच्या आणि जगभर घडणार्‍या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःमध्ये काही बदल करत असते. हे बदल पहिल्या किंवा दुसर्‍या पिढीत स्पष्टपणे दृग्गोचर होतात. मात्र आता या बदलाच्या वेगाच्या बाबतीत जमाना बदलला आहे. नवा बदल दिसून येण्यासाठी एका किंवा दोन पिढ्यांची वाट बघण्याची गरज राहिलेली नाही. दर आठ-दहा वर्षांनी तंत्रज्ञान बदलत आहे. नवीनवी तंत्रज्ञाने आपल्या हातात यायला लागले आहेत आणि अशी तंत्रज्ञाने हातात आली की बघता बघता माणसाचे वर्तन आणि दृष्टिकोन यात मोठा बदल झालेला दिसत आहे. म्हणजे पूर्वी जो बदल ३० ते ४० वर्षांच्या कालखंडानंतर दिसत असे तो आता ५ किंवा १० वर्षांच्या कालखंडात दिसायला लागला आहे. ज्या लोकांना या बदलाचे वेध घ्यायचे आहेत, ज्यांना हे बदल हाताळायचे आहेत किंवा ज्यांना या बदलांना काही वळण लावायचे आहे त्या लोकांना बदलाच्या या वेगाने भोवळ येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही चिंता प्रकट होत आहे.

नेमके काय निष्कर्ष हाती आलेले आहेत? पूर्वी शिक्षकांची विद्यार्थ्यांवर दहशत होती. आता विद्यार्थ्यांचीच शिक्षकांवर दहशत निर्माण झाली आहे. नववी, दहावीतील मुलेसुध्दा शिक्षकांवर डोळे वटारायला लागली आहेत. मुलांच्या दप्तरांमध्ये पूर्वीच्या काळी गारगोट्या, सुतळ्या, खिळे, मोराचे पीस अशा वस्तू आढळायच्या परंतु आता त्यांच्या दप्तरात मारामारी करण्याची साधने सापडत आहेत. हिंगोली शहरातील एका मुलीच्या दप्तरात चक्क गावठी पिस्तुल सापडले. अर्थात तिने कोणाचातरी खून करण्यासाठी ते आणलेले नव्हते. तिला ते खेळणे वाटत होते आणि आपल्या मैत्रिणीला आपल्या घरातले हे खेळणे दाखवण्यासाठी तिने ते आणले होते. चुकून ते शिक्षकांच्या नजरेस पडले आणि सर्वांना धक्काच बसला. मात्र या प्रकारात आपण मुलांना दोष देणार आहोत का? या मुलीच्या दप्तरात पिस्तुल सापडले पण ते तिच्या घरात होते म्हणून तिच्या दप्तरात आले. तिच्या वडिलांनी ते आणलेले होते. वास्तविक तिचे वडील एक सरकारी कर्मचारी आहेत. मग त्यांना ते खरेदी करावे असे का वाटले? मुलीच्या दप्तरात पिस्तुल सापडणे या समस्येचे मूळ तिच्या वडिलांच्या मनोवृत्तीत आहे.

मुले मारामार्‍या करतात, हिरोगिरी करतात, ती व्यसनी आहेत, शिक्षकांचा मार खात नाहीत उलट त्यांच्यावरच डाफरतात. या सगळ्या समस्यांचे मूळ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या संबंधात आहे. काळ वेगाने बदलला तरी या तिघांचे आपापसातील संबंध बदललेले नाहीत. त्याचा हा परिणाम आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न काहीवेळा विचारला जातो. जे जाणकार पालक आहेत ते हात झटकतात आणि ही जबाबदारी शिक्षकांची आहे असे म्हणून ती जबाबदारी ते शिक्षकावर ढकलतात आणि शिक्षक हे काम पालकांचे आहे म्हणून त्यांच्यावर ढकलतात. ही जबाबदारीची ढकलाढकली एकवेळ परवडली. कारण यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व नावाचा काही प्रकार असतो आणि ते घडवायचे असते ही तरी जाणीव दिसून येते. परंतु बहुसंख्य शिक्षक आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण हा जाणीवपूर्वक करण्याचा काही प्रकार आहे ही भावनाच निर्माण झालेली नाही. त्यामुळे मुले त्यांना जे दिसते, त्यांना जे अनुभवायला येते आणि त्यांना जे जाणवते त्यानुसार आपोआप घडत जातात. मात्र त्यांच्या पाहण्यात, त्यांच्या अनुभवण्यात आणि त्यांच्या जाणवण्यात आता आमूलाग बदल झालेला आहे. हा बदल जोपर्यंत आपण समजून घेणार नाही आणि त्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा नवा विचार स्वीकारणार नाही तोपर्यंत मुलांच्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल आपल्याला भयावहच वाटत राहणार आहेत.

Leave a Comment