हरित क्रांतीची नवी दिशा


दुसरे महायुद्ध संपले तेव्हा नाही म्हटले तरी जगाला एक स्थैर्य प्राप्त झाले. कारण युद्धाने किती विध्वंस होतो हे जगाने अनुभवले होते आणि आता नंतर महायुद्ध नको अशी सार्‍या मानवतेचीच धारणा झाली होती. पण, तुलनेने स्थिर झालेल्या या मानवतेला अन्य समस्या भेडसवायला लागल्या. त्यातली पहिली समस्या होती धान्याची. जगाची लोकसंख्या वाढत चालली होती पण त्या प्रमाणात धान्याची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे गहू आणि तांदूळ या दोन पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होणे गरजेचे होते. या गरजेतून हरित क्रांती साकार झाली आणि या क्रांतीने मानवतेची या दोन धान्यांची गरज भागवणारे वाण विकसित करून ते रूढ केले. नॉर्मन बोरलॉग याने या जाती शोधून काढल्या म्हणून त्याला नोबेल पुरस्कार दोनदा देण्यात आला. त्याने मानवतेसमोरचा मोठा प्रश्‍न सोडवला पण त्यासाठी गव्हाच्या नव्या जाती शोधताना डोळ्यासमोर त्यावेळची गरज ठेवली. मानवतेला अ्रधिक उत्पादन देणार्‍या जाती हव्या होत्या. बुटक्या (म्हणजे न लोळणार्‍या) तसेच रोगांना बळी न पडणार्‍या जाती त्यांनी शोधल्या.

अशा जाती रासायनिक खतांना प्रतिसाद देणार्‍या होत्या. म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढवून त्यांचे उत्पादन वाढवण्यात आले. याही क्रांंतीला आता पंचाहत्तर वर्षे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात मानवी लोकसंख्या आणखी वाढली असून वाढत्या राहणीमानानुसार धान्याची मागणीही वाढली आहे आणि आता वाढत असलेल्या लोकसंख्येला खायला काय घालणार असा प्रश्‍न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. या प्रश्‍नामागे आता प्रचलित असलेल्या जातींच्या उत्पादन क्षमतेत ग्लोबल वॉर्मिंगने आलेली घट हेही एक कारण आहेच. पहिल्या हरित क्रांतीत शोधल्याप्रमाणे संकरित जाती शोधण्यालाही मर्यादा आहेत म्हणून अजून संकरित जाती शोधून मानवतेसमोरचा नवा प्रश्‍नही सोडवणे शक्य नाही असे लक्षात आले आहे. म्हणून आता नव्या दिशेने शोध सुरू करण्यात आले आहे. बियाणांत जनुकीय बदल करण्याचा एक मार्ग आहे. पण त्यात पिकांवर पडणार्‍या रोगांचा विचार प्राधान्याने करण्यात आला आहे. त्यात मुळात पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्याची तरतूद नाही आणि या बदलाला काही सनातनी लोकांचा निरनिराळ्या कारणांनी विरोध होत आहे. तेव्हा ही जनुकीय क्रांती सरसकट व्यवहारात येऊन मानवतेचा धान्याचा प्रश्‍न फार परिणामकारकरित्या सुटण्याची शक्यता दिसत नाही. त्यावर आणखी एक पर्याय शोधण्यात आला. तो म्हणजे जादा उत्पादनापेक्षा जादा सकस धान्य निर्माण करण्याचा.

या दिशेने बाजरीच्या काही जाती शोधण्यातही आल्या आहेत. आपण आता खातो ती बाजरी म्हणावी तेवढी सकस नाही. तिच्या दोन भाकरी खाल्ल्या तरीही पोट भरत नाही. तेव्हा आता अशी सकस बाजरी शोधण्यात आली आहे की जी प्रचलित बियाणांपेक्षा सकस असल्याने तिची एकच भाकरी पोट भरण्यास पुरेशी होईल. यातल्या काही वाणांची बाजरी तर चक्क शक्तिवर्धक औषध म्हणून वपारली जायला लागली. असे असले तरीही मानवतेची समस्या सोडवण्यास हा बदल फारसा उपयुक्त ठरणार नाही असे दिसायला लागले आणि या प्रकाराच्या मर्यादाही आहेत हे लक्षात यायला लागले. आता शास्त्रज्ञांनी नवा मार्ग चोखाळला आहे तो मुळात पिकांच्या प्रकाश संश्‍लेषणाच्या क्षमतेत वाढ करण्याचा. कोणतीही वनस्पती हा सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करण्याचा उद्योग असतो. सूर्यप्रकाश, वनस्पतीतील हरित द्रव्य आणि पाणी यांचा वापर करून अन्न तयार करण्याची क्षमता निसर्गाने वनस्पतींत ठेवलेली असते. पण शास्त्र असे सांंंगते की, सर्वच वनस्पती ही क्षमता १०० टक्के वापरत नाहीत. त्यांचीही स्थिती माणसासारखीच असते.

मनुष्य प्राण्यातही निसर्गाने अफाट क्षमता ठेवलेली आहे पण माणसे त्या क्षमतेचा एक टक्काही हिस्सा वापरत नाहीत. तसेच वनस्पतीही आपली अन्न तयार करण्याची सारी क्षमता वापरत नाहीत. त्याही एकूण क्षमतेच्या एक टक्का हिस्साच वापरत असतात. तेव्हा त्यांच्या या क्षमतेचा विकास करण्याचे तंत्र विकसित केले गेले तर धान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल. आता ब्रिटीश शास्त्रज्ञांनी असा विकास करून गव्हाचे पारजनुक वाण विकसित केले आहे. गव्हात सामावलेल्या प्रकाश संश्‍लेषणाच्या अफाट क्षमतेवर संशोधन करून विकसित करण्यात आलेल्या अशा नव्या वाणात सामान्य गव्हापेक्षा ४० टक्के जादा उत्पादन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी आणि मानवी जातीत धान्यासाठी दंगली होऊ नयेत यासाठी हा प्रयत्न उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारच्या अनेक धान्यांच्या जाती निर्माण झाल्या तर मानवतेला ते वरदानच ठरणार आहे. या नव्या वाणांच्या चाचण्या सुरू आहेत. २०१८ आणि २०१९ अशा दोन वर्षात त्या केल्या जातील आणि मानवतेच्या इतिहासात ती दुसरी हरित क्रांती ठरेल. तशा झाले तरच गरीब लोकांना माफक किंमतीत धान्य मिळेल. माणूस आपल्या परीने खूप प्रयत्न करीत आहे पण निसर्गात होणार्‍या बदलांनी माणसाच्या या प्रयत्नांना खो दिला जात आहे. असे असले तरीही माणसाची जिद्द कमी झालेली नाही. या दुसर्‍या हरित क्रांती नंतर नॅनो टेक्नालॉजीत तर फार मोठी क्षमता दडलेली आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment