मुंबई – देशातील खाजगी, विदेशी व राष्ट्रीयकृत बँकांतील १० लाख बँक कर्मचारी व अधिकारी २८ फेब्रुवारीला कामगार कायद्यात होणारे बदल आणि बँकींग यंत्रणेतील समस्यांविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय संपावर जाणार आहेत. सोमवारी प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती बँक कर्मचारी संघटनांची कृती समिती असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दिली.
बँक कर्मचाऱ्यांचा २८ फेब्रुवारीला देशव्यापी संप
संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले, बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नोटबंदीनंतर केलेल्या कामाचे पंतप्रधान कौतुक करत आहेत. मात्र दोन महिन्यांत त्याचा मोबदला मिळालेला नाही. याउलट बाजारात २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र ५०० व २ हजार रुपयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशिन अद्याप एकाही बँक शाखेत पुरवलेल्या नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे थांबवून तत्काळ कायम स्वरूपी तत्त्वावर भरती करण्याची संघटनेची मागणी आहे.