जेलची हवा खा तीही पदरचे पैसे भरून


तुरूंग म्हटले की चोर, दरोडेखोर, गुन्हेगार, खुनी, अफरातफरी करणारे, चिटर, खिसेकापू आठवणे साहजिकच. या उलट एखाद्या सज्जन माणसाला जेलचे नांव काढले तरी छातीत धडधड होणार. कुठल्याही देशात किवा संस्कृतीत तुरूंगवास हा वाईटच मानला जातो. कसे असेल तुरूंगातले आयुष्य याचीही अनेकांना उत्सुकता असते. भले भले तुरूंगात जावे लागू नये म्हणून दोषी असतानाही पैसा पेरून तुरूंगवास चुकवायला बघतात. मात्र आता असे एक खास जेल भारतात सुरू झाले आहे जेथे आपणच दिवसासाठी ५०० रूपये भरायचे व जेलमधल्या जीवनाचा अनुभव घ्यायचा.

तेलंगणातील संगारेड्डी येथील २२० वर्षे जुने तुरूंग पर्यटकांसाठी सज्ज झाले आहे. फिल द जेल असेच या योजनेचे नांव आहे. या तुरूंगाचे आता म्युझियम बनविले गेले आहे व ज्यांना तुरूंग जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तेथे सोय केली गेली आहे. येथे ५०० रूपये भरून नोंदणी केली की जेलमध्ये जाताना तुमचे सामान, कपडे बाहेर ठेवून प्रथम कैद्यांचे कपडे, एक थाळी दिली जाते. सायंकाळी कोठडीत बंद केले जाते व त्यानंतर कुणाशीही बोलणे, कुणाला भेटणे शक्य नसते.

तीन एकर परिसरात असलेल्या या तुरूंगात पैसे भरून गेस्ट म्हणून प्रवेश केला तरी कैद्यांप्रमाणे तुरूंगाची साफसफाई करावी लागते. जेवण कैद्यांना दिले जाते तसेच असते व झोपण्याची व्यवस्थाही कैद्यांप्रमाणेच केली जाते. महिला पुरूष कुणीही हा अनुभव घेऊ शकतात. विशेष म्हणजे या तुरूंगात प्रवेश करण्यासाठी कोणताही गुन्हा करण्याची आवश्यकता नाही फकत पैसे भरले की झाले.

Leave a Comment