नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकार तब्बल २.८३ लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची शक्यता वर्तवली होती.
केंद्र सरकारमध्ये पुढील आर्थिक वर्षात २.८३ लाख नोकऱ्या
या आर्थिक वर्षात सरकार नव्या नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. २०१६मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३२.८४ लाख इतकी आहे. २०१८मध्ये ही संख्या ३५.६७ लाख इतकी असेल असे जेटली म्हणाले होते. गृहमंत्रालयात ६,०७६ कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. २०१८पर्यंत गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या २४,७७८ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस विभागात तब्बल १.०६ लाख तरुणांना संधी मिळणार आहे. पुढील वर्षापर्यंत पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या ११,१३,६८९ इतकी होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयात सध्या ९,२९४ कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील वर्षापर्यंत आणखी २,१०९ जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नव्या कौशल्य विकास मंत्रालयात २,०२७ जागा भरल्या जाणार आहेत. सध्या या मंत्रालयात फक्त ५३ कर्मचारी काम करतात.