मार्चनंतर जिओ बंद करणार मोफत सेवा !


मुंबई: रिलायन्स जिओच्या मोफत सेवेमुळे सध्या सर्वच खूश आहेत. पण मार्चनंतर ही मोफत सेवा बंद होण्याची शक्यता आहे. जिओ एप्रिलपासून ग्राहकांकडून नाममात्र दर आकारण्याच्या विचारात आहे. यासाठी जिओ १०० ते १५० रुपये शुल्क आकारण्याची शक्यता आहे. सध्या ७.२ कोटी पेक्षा जास्त जिओच्या ग्राहकांची संख्या आहे. जर ही सेवा बंद झाली तर या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम पडू शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जिओवर मोफत सेवा बंद करण्यासाठी दबाव वाढत आहे. शिवाय आपला यूजर बेस निश्चित करण्यासाठी रिलायन्स जिओ मार्च-एप्रिलपासून ट्रायल बिलींग सुरु करण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना कंपनीच्या विविध प्लॅन पैकी एकाची निवड करण्यास सांगितले जाऊ शकते. रिलायन्स जूनपर्यंत मोफत सेवा देण्याच्या विचारात होते. मात्र प्रतिस्पर्धी कंपन्यांनी प्रमोशनल ऑफर संदर्भात ट्रायकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव आला आहे. त्यामुळे जिओला मोफत सेवा बंद करावी लागण्याची शक्यता असल्यामुळे जिओने बिलिंगचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे.

जिओविरोधात टेलिकॉम डिस्पूट सेटलमेंट आणि एलिटेड ट्रॅब्यूनलमध्ये भारती एअरटेल लिमिटेड आणि आयडिया सेल्यूलर लिमिटेडने अपील केले आहे. या दोन्ही ऑपरेटर्सची तक्रार आहे की मोफत सेवेला एक्सटेंशन देणे ट्रायच्या नियमांचे उल्लंघन आहे. यावर ट्रायने जिओने नियमांविरोधात काही केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच जिओ आणि प्रतिस्पर्धी टेलिकॉम यांच्या अपीलावर ट्रॅब्यूनलने अद्याप निर्णय दिलेला नाही.

Leave a Comment