परीक्षा – मुलांची आणि पालकांची सुद्धा ..


नवीन वर्षाची धामधूम आता संपली आहे. नवे वर्ष सुरु झाले आणि नव्या वर्षाचा पहिला महिना पाहता पाहता सरला. आता चाहूल लागली आहे, ती लवकरच सुरु होणार असलेल्या मुलांच्या परीक्षांची. परीक्षेचा काळ मुले आणि पालक ह्या दोहोंसाठी अतिशय महत्वाचा आणि त्याचबरोबर थोड्याफार तणावाचा असतो. अश्यावेळी आपण पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतल्यास हा काळ मुलांकरिता आणि पालक म्हणून आपल्याकरिता जास्त तणावपूर्ण ठरत नाही. त्याचबरोबर मुलांना पालकांकडून भक्कम मानसिक आधार मिळाला तर त्यांचा आत्मविश्वास बळावतो आणि परीक्षेच्या बागुलबुवाची भीती नाहीशी होण्यास मदत मिळते.

१. परीक्षेच्या काळात मुलांवर विशेष लक्ष द्यायला हवे. अभ्यासाच्या चिंतेमुळे मनावर आलेल्या ताणाबद्दल मुलांना नेहमी बोलून दाखवता येतेच असे नाही. पण अश्यावेळी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून हा तणाव व्यक्त होत असतो. झोप न लागणे किंवा अति झोप येणे, भूक एकदम वाढणे, किंवा एकदम नाहीशी होणे, अचानक आलेला ताप, पोटदुखी, हे मुलांवर असलेल्या मानसिक ताणाचे संकेत असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मुलांशी संवाद साधून त्यांच्या मनावरचा ताण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मुलांना समयनियोजनाचे महत्व पटवून देत अभ्यासाचे वेळापत्रक आखण्यास मदत करावी, आणि त्याचबरोबर केलेले वेळापत्रक पाळायलाही मुलांना प्रवृत्त करावे. “आपली तयारी पुरेशी झाली आहे की नाही”, किंवा “आपल्याला पेपर लिहिताना उत्तरे आठवतील किंवा नाही”, अश्या चिंता मुलांना सतत भेडसावत असतात. अभ्यासाचे वेळापत्रक आखून त्या प्रमाणे अभ्यास केल्याने उजळणीसाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळून परीक्षेसाठी उत्तम प्रकारे तयारी करता येते हे मुलांना पटवून द्यावे.

२. मुलांनी ठराविक वेळीच अभ्यास केला पाहिजे असा आग्रह धरणे पालकांनी टाळावे. प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासाच्या वेळेचे गणित वेगळे असते. काहींना रात्री जागून अभ्यास करायला आवडते तर काहींना पहाटे लवकर उठून अभ्यास छान जमतो. त्यामुळे मुलांना, त्यांच्या पसंतीची अभ्यासासाठीची वेळ निवडू द्यावी. पण त्याचबरोबर आवश्यक तितकी विश्रांती देखील मुलांना मिळते आहे की नाही याकडे लक्ष द्यावे.

३. मुलांच्या आहारावर आणि प्रकृतीवर या काळामध्ये विशेष लक्ष द्यावयास हवे. पौष्टिक आहार, नियमित झोप आणि व्यायाम यामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते.

४. परीक्षा म्हटले की “टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सगळेच बंद” असे काही पालकांचे धोरण असते. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर मुलांना थोडे मनोरंजन, करमणूक सुद्धा गरजेची असते हे ही विसरून चालणार नाही. मात्र मनोरंजनासाठी किती वेळ द्यायचा या बाबत मुलांशी चर्चा करावी.

५. लहान मुलांच्या अभ्यासासाठी वेळापत्रक आखताना प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघून घ्यावा. त्यामुळे किती अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, किंवा किती राहिला आहे याची कल्पना येते. एखाद्या विषयातील काही संकल्पना जर मुलांना समजून घ्यायला अवघड जात असतील, तर त्या सोप्या करून मुलांना समजावून सांगाव्यात. यासाठी आवश्यक वाटल्यास इंटरनेट ची मदत घ्यावी. वेळोवेळी मुलांकरता रिव्हिजन टेस्ट घेतल्याने मुलांची तयारी चांगली करून घेता येते.

६. मुलांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपली मदत तेव्हाच होऊ शकते, जेव्हा पालक म्हणून आपण आपल्या मनावरचा ताण नियंत्रणात ठेवतो. प्रत्येक मुलाच्या आवडी-निवडी, एकाग्रता, बुद्धिमत्ता वेगवेगळी असते हे लक्षात घेऊन आपण आपल्या पाल्याकडून करत असलेल्या अपेक्षा रास्त आहेत किंवा नाही याचा विचार सर्व पालकांनी जरूर करायला हवा. आपल्या अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षांचे ओझे मुलांवर लादणे टाळायला हवे. अश्या अवास्तव अपेक्षा मुलांच्या बाबतीत मानसिक तणावाला कारणीभूत ठरतात. मुलांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असताना, अपयश कश्याप्रकारे हाताळायला हवे याबद्दलही मार्गदर्शन करावे. अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडणे हे सुद्धा मुलांकरता एक प्रकारचे अपयशच आहे. पण त्यामुळे खचून न जाता आणखी प्रयत्न करण्यास मुलांना सतत प्रोत्साहन द्यावे.

परीक्षेच्या काळात मुलांना समजून घेण्याची, मार्गदर्शनाची, प्रोत्साहनाची गरज असते, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास दृढ होऊन परीक्षेत यश संपादन करता येणे शक्य होते. या प्रयत्नांमधे मुलांबरोबरच जर पालकांनी सुद्धा आपल्या जबाबदारीचा वाटा समर्थपणे उचलला तर यशाकडे वाटचाल सोपी होऊन जाते.

Leave a Comment