नाव डेड सी पण येथे कुणीच बुडत नाही


जगात कोणताही समुद्र घ्या. समुद्र आणि बुडणे अथवा वाहून जाणे यांचा संबंधही दाट आहे. यामुळे कुठेही त्यातही पर्यटनस्थळ असलेल्या समुद्राच्या किनार्‍यावर लाईफ गार्ड दिसतात. पोहता न येणारेच काय पण चांगले पोहणारेही अनेकदा समुद्रात बुडतात हेही आपण नेहमी ऐकत असतो. जाॅर्डन व इस्त्रायल या देशांच्या सीमेवर असलेल्या या समुद्राच्या नावात डेड शब्द आहे मात्र त्याचे खास वैशिष्ट म्हणजे अजिबात पोहता न येणाराही या समुद्रात बुडत नाही म्हणजेच त्याला बुडून मृत्यू येऊ शकत नाही.आणि पट्टीच्या पोहणार्‍यांना यात पोहता येत नाही कारण माणूस येथे आपोआपच तरंगतो. हा समुद्र पृथ्वीवरील सर्वात लोएस्ट पॉईंट आहे म्हणजे तो समुद्रपातळीखाली १४०० फूट आहे. अति उष्णतेमुळे तो वेगाने आटत चालला आहे.

या समुद्राला डेड सी हे नांव पडण्यामागचे कारण म्हणजे यात क्षाराचे प्रमाण इतके जास्त आहे की त्यात कोणत्याही वनस्पती जगू शकत नाहीत तसेच समुद्रीजीवही जगू शकत नाहीत. या क्षारांमुळे समुद्राचे पाणी अन्य समुद्रांच्या तुलनेत सात ते आठपट अधिक खारट आहे. अनेकदा या पाण्याच्या पृष्ठभागावरही मिठाचे कण जमा झालेले दिसतात. याच्या किनार्‍यावरही चिखल आहे. या समुद्राजवळची जमीनही इतकी खडकाळ व क्षारयुक्त आहे की चपला घातल्याशिवाय त्यावरून चालणे म्हणजे पायांना जखमा करून घेण्यासारखे आहे.

विशेष म्हणजे हा डेड सी पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. त्यामागचे कारण म्हणजे या समुद्राचे पाणी व किनार्‍यावरचा चिखल औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. या पाण्यात तरंगले तर त्वचा रोग दूर होतात तसेच दम्यासह अन्य अनेक विकारांवरही आराम पडतो. येथला चिखल त्वचेवर लावून धुतल्यानंतर त्वचा ताजीतवानी होते. सुरकुत्या जातात व एक वेगळाच नरमपणा त्वचेला मिळतो. अर्थात या पाण्यात जास्त काळ राहणे हिताचे नाही किंबहुना जास्त वेळ या पाण्यात तरंगता येत नाही. कारण क्षारांमुळे त्वचेची आग होऊ शकते.

Leave a Comment