कॉफी बद्दल थोडे काही..


आपण मित्र-मैत्रिणींसोबत, सहकाऱ्यांसोबत कित्येकदा बाहेर कॉफीसाठी भेटत असतो. आधीच्या काळी “कॉफी” म्हटले, की फिल्टर कॉफी, इन्स्टंट कॉफी किंवा कोल्ड कॉफी एवढे प्रकार आपल्या परिचयाचे होते. पण आजकालच्या “कॅफे कॉफी डे” आणि “स्टारबक्स” च्या युगात कॉफीचे निरनिराळे प्रकार आपल्या पाहण्यात येत असतात. पहिल्याप्रथम हे सगळे प्रकार पाहणाऱ्याला एकदम गोंधळायला होते. अश्यावेळी या सगळ्या वेगवेगळ्या कॉफीच्या प्रकारांपैकी एखादा पर्याय निवडताना आपण नक्की काय मागवतो आहोत याची माहिती असणे आवश्यक होऊन बसते. कॉफीच्या अनेकविध लोकप्रिय प्रकारांबद्दल थोडेसे :

१. एस्प्रेसो : हा प्रकार कॉफीचे प्राथमिक रूप आहे असे म्हणता येईल. यामध्ये कॉफीच्या बिया दळून, त्यावर गरम पाणी घालून कॉफीच्या बियांचा अर्क काढला जातो. हा अर्क जास्त ‘कॉन्सन्ट्रेटेड’ असल्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात ( साधारणतः ३० मि.लि ) सर्व्ह केला जातो. त्याचमुळे एस्प्रेसो साठीचे कपदेखील आकाराने सामान्य कपापेक्षा लहान असतात. या कॉफीमध्ये दुधाचा वापर केला जात नाही.

२. माकियातो : ह्या प्रकारच्या कॉफी मध्ये आधी एस्प्रेसो घालून त्यावर दूध घुसळून तयार केलेला ‘फोम’ किंवा फेस घातला जातो. दुधाच्या फोममुळे कॉफी तितकी कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात राहात नाही.

३. लाटे : ‘लाटे’ ह्या कॉफीच्या प्रकारामध्ये कपमध्ये आधी एस्प्रेसो घातली जाते, त्यावर गरम दूध घालून, सगळ्यात वर दुधाचा फोम घातला जातो. ‘लाटे’ गरम किंवा गार ( आईस्ड ) ह्या दोन्ही प्रकारांमध्ये मिळते. ‘लाटे आर्ट’ हा प्रकारही खूप लोकप्रिय आहे. त्यामध्ये दुधाचा फोम कॉफीवर घालताना वेगवेगळी सुंदर डिझाईन कॉफीवर तयार केली जातात.

४. फ्लॅट व्हाईट : यामध्ये एस्प्रेसो आणि त्यावर गरम दूध एवढे दोनच घटक असतात. त्यावर दुधाचा हलका फोम असतो.

५. कॅपुचिनो : हा कॉफीचा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय म्हणता येईल. यामध्ये सगळ्यात आधी एस्प्रेसो तयार करून कपमध्ये घातली जाते, त्यावर गरम दूध, त्यावर दुधाचा फोम आणि सगळ्यात वर कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर भुरभुरली जाते.

६. मोका : ह्या प्रकाराला “चॉकलेट कॉफी” म्हणता येईल, कारण या कॉफी मध्ये आधी एस्प्रेसो घातली जाते आणि त्यावर हॉट चॉकलेट घातले जाते. त्यावर गरम दूध घातले जाते.

७. डॉपिओ : डॉपिओ ह्या कॉफीच्या प्रकारामध्ये एस्प्रेसो चे दोन शॉट्स ( ६० मि.लि ) कपमध्ये घातले जातात, यालाच डबल एस्प्रेसो असे ही म्हणतात.

८. लॉन्ग ब्लॅक : ह्या प्रकारच्या कॉफीमध्ये डबल एस्प्रेसो आणि गरम पाणी एवढे दोनच घटक असतात.

ही कॉफी च्या निरनिराळ्या प्रकारांची थोडीशी तोंडओळख.

Leave a Comment