उत्तर प्रदेशातील दंगलीचा पहिला फेरा


उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची पहिली फेरी आज शनिवारी पार पडत आहे. सात टप्प्यात होणार असलेल्या या निवडणुकीतील पश्‍चिम उत्तर प्रदेशातल्या ७३ मतदार संघात आज मतदान होणार आहे. १५ जिल्ह्यातील १ कोटी १७ लाख मतदार आज ८३९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. उत्तर प्रदेशाची निवडणूक आज सुरू होणार आहे. पश्‍चिम उत्तर प्रदेशात मुस्लीम मतदारांचा मोठा भरणा आहे आणि हे मतदार कोणाला मतदान करणार हा कळीचा मुद्दा कालपर्यंत अनुत्तरित राहिला होता. राज्यातील मुस्लिमांची मते जर संभ्रमात राहिली आणि त्या संभ्रमामुळे ती मते विखुरली गेली तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. साधारणतः मुस्लीम मतदारांचा ओढा समाजवादी पार्टीकडे असतो आणि समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव हे ९ टक्के यादव मते आणि १८ टक्के मुस्लीम मते यांच्या जोरावर सत्ता मिळवतात. आजवर जेव्हा जेव्हा मुस्लीम मतदारांनी मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीला एकमुखाने मते दिली आहेत तेव्हा तेव्हा समाजवादी पार्टीला सत्ता मिळवणे सोपे गेलेले आहे.

यावेळी मात्र समाजवादी पार्टीचे नेते आपापसात भांडत आहेत. पक्षात फूट आहे, मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांना ऍन्टी इन्कम्बन्सी फॅक्टरचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा यादव समाज तरी त्यांच्या मागे एकमुखाने उभा राहिल की नाही असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. यादवच संघटित नसतील तर आपण तरी त्यांच्या मागे जाऊन आपले मत वाया कशाला घालवायचे असा प्रश्‍न मुस्लीम मतदारांना पडलेला आहे. कारण राज्यातले मुस्लीम मतदार नेहमीच एकमुखाने मतदान करतात आणि भाजपाचा पराभव करू शकेल अशा पक्षाच्याच मागे उभे राहतात. यावेळी समाजवादी पार्टी भाजपाचा पराभव करू शकेल असा विश्‍वास निर्माण करण्यात अखिलेश यादव यांना यश आलेले नाही. त्यांच्या मनात विजयाविषयी आत्मविश्‍वास नाही. त्यामुळेच त्यांनी पराभवाच्या खाईत सापडलेल्या कॉंग्रेसबरोबर युती करून निवडणुकीत कसल्याही आशा नसलेल्या कॉंग्रेस पक्षाला आपल्या सायकलच्या मागच्या सीटवर बसवून घेतलेले आहे. या युतीतून समाजवादी पार्टीच्या मनातला आत्मविश्‍वासाचा अभाव व्यक्त झाल्यामुळे मुस्लीम मतदार त्यांच्या मागे एकमुखाने उभे राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत. काही मुस्लीम मतदार त्यांच्या मागे जातील आणि काही मुस्लीम मतदार मायावती यांच्यामागे जातील असा कयास केला जात आहे.

मुस्लिमांची मते अशी विखरून गेली की भाजपाचा विजय होतो. असे उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचे सूत्र आहे. त्यामुळे मायावतींच्या मागे जावे की समाजवादी पार्टीच्या मागे जावे यावरून मुस्लीम समाजात निर्माण झालेला संभ्रम भाजपासाठी आशादायक ठरला होता. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मुस्लीम नेत्यांनी हा संभ्रम संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी मुस्लीम मतदारांच्यावतीने मायावती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती यांच्यादृष्टीने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातली ही जमेची बाजू ठरली आहे. उत्तर प्रदेशात कोणाचा विजय होईल आणि कोण सत्तेवर येईल याविषयी अनेक सर्व्हेक्षणे झालेली आहेत आणि अनेकांनी आपापले अंदाज मांडले आहेत. त्यातल्या बहुतेक निरीक्षकांनी मायावतींची दखल घेण्याचीसुध्दा तसदी घेतली नाही. या सर्वांनी मायावतींना तिसर्‍या स्थानावर ढकलले आहे. परंतु शेवटच्या क्षणी मिळालेला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मायावतींना पहिल्या क्रमांकावरसुध्दा आणू शकतो. इतके या पाठिंब्याचे महत्त्व मानले जाते.

मात्र या पाठिंब्याला दुसरी एक बाजू आहे की उत्तर प्रदेशातले मुस्लीम बुखारींचे म्हणणे शब्दशः मानतात का? समाजवादी पार्टीचे समर्थक या दृष्टीने बुखारींना महत्त्व द्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने बुखारीचा पाठिंबाच मुळात महत्त्वाचा नाही. तसा तो नसल्यामुळे मुस्लीम मतदारांची परिस्थिती गोंधळलेलीच राहणार आहे. समाजवादी पार्टीने या निवडणुकीत कॉंग्रेसने युती केली आहे. तिच्या मागे सुध्दा मुस्लीम मतदारांची मनधरणी करण्याचाच हेतू आहे. कारण उत्तर प्रदेशात कॉंग्रेसलाही मानणारा मुस्लीम मतदारांचा एक वर्ग आहे. असे असले तरी कॉंग्रेस पार्टी ज्या आत्मविश्‍वासाने आणि तीव्र इच्छाशक्तीने या निवडणुकीच्या मैदानात उतरली होती ती इच्छाशक्ती आणि तो जोर प्रचाराच्या दरम्यान कमी झालेला दिसत आहे. दोन पक्षांची युती जाहीर झाली तेव्हा प्रियंका गांधी मैदानात उतरणार आणि आता कॉंग्रेसची स्थिती एकदमच बदलणार अशा प्रकारच्या आशावादी चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात सुरू झाल्या होत्या आणि त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले दिसत होते. मात्र निवडणुकीचा प्रचार जसजसा पुढे सरकत आहे तसे प्रियंका वड्रा यांची उपस्थिती जाणवण्याऐवजी अनुपस्थिती अधिकच जाणवायला लागली आहे. एकंदरीत सध्या तरी मायावतींनी आपली परस्थिती सुधरवल्याचे दिसत आहे. कदाचित अनपेक्षितपणे त्याच बाजी मारून जातील की काय अशी शक्यता दिसायला लागली आहे.

Leave a Comment