प्रसाधनासाठी स्किन क्रीम्स निवडताना ..


नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने, समारंभांसाठी, किंवा रोजच्या दैनंदिन व्यव्यवहारांसाठी घराबाहेर पडताना वेशषभूषेची काळजीपूर्वक निवड करणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर प्रसाधन हा देखील वेशभूषेचा महत्वाचा भाग आहे, विशेषतः महिलांसाठी. प्रसाधनांचा वापर करत असताना लिपस्टिक्स, आय-मेकअप बरोबरच अनेकविध स्किन क्रीम्स चा सुद्धा सर्रास वापर केला जातो. लिपस्टिक्स किंवा आय-मेकपची निवड रंगांच्या छटा बघून करता येऊ शकते, पण स्किन क्रीम्सची निवड करण्याचे निकष काहीसे वेगळे असतात. स्किन क्रीम्स निवडताना, कुठली क्रीम्स कश्या प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहेत, त्या क्रीम्स मध्ये असणारे घटक, त्यांचे फायदे इत्यादी गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ टीव्हीवर किंवा मासिकांमधून पाहिलेल्या आकर्षक जाहिरातींच्या आहारी न जाता आपण निवडत असलेल्या क्रीम्सची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे.
बाजारात आजकाल अनेकविध स्किन क्रीम्स उपलब्ध आहेत. पण सगळीच स्किन क्रीम्स सारखी नसून त्यांचे प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणजेच, काही क्रीम्स त्वचेला आर्द्रता देण्यासाठी बनविलेली असतात, ( ज्यांना आपण moisturiser म्हणतो ), तर काही सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी असतात, ( ज्यांना आपण डेली डिफेन्स क्रीम्स म्हणतो. ) त्याचबरोबर, त्वचेवरील मुरुमे-पुटकुळ्या घालविण्यासाठी, त्वचेचा पोत सुधारण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारची क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा आपली प्राथमिक गरज लक्षात घेऊन मगच स्किन क्रीमची निवड करावी.

१. बी बी क्रीम्स – या प्रकारच्या क्रीम्सना “ब्युटी बाम” (bb) म्हटले जाते. ही क्रीम्स प्रामुख्याने त्वचेला आर्द्रता देण्यासाठी, त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी वापरली जातात. अश्या प्रकारची क्रीम्स सहसा सर्व त्वचाप्रकारांसाठी योग्य असतात. ह्या क्रीम्समुळे सहसा कुठलेही दुष्परिणाम उद्भवत नाहीत.

२. सी सी क्रीम्स – “कलर कंट्रोल” करणाऱ्या या क्रीम्सना “सी सी” क्रीम्स असे म्हटले जाते. काहींच्या त्वचेवर नेहमी फिकेपणा दिसतो किंवा रॅश आल्यासारखा लालसरपणा दिसतो, अश्या प्रकारच्या त्वचेसाठी ह्या क्रीम्सचा वापर होतो. पण ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे किंवा ज्यांना त्वचेचे विकार आहेत अशांनी ह्या क्रीम्सचा वापर आवर्जून टाळायला हवा.

३. डी डी – “डेली डिफेन्स” ह्या प्रकारात मोडणारी ही क्रीम्स त्वचेला आर्द्रता देताना त्याचबरोबर उन्हामुळे त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणामांपासून त्वचेचे रक्षण करतात. मात्र गरजेपेक्षा अधिक वापर केल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होऊन मुरुमे-पुटकुळ्यांचा त्रास या क्रीम्समुळे उद्भवू शकतो. त्यामुळे माफक प्रमाणातच ह्या क्रीम्सचा वापर करावा.

४. पी पी – “परफेक्ट पिंक” म्हणून ओळखली जाणारी ही क्रीम्स प्रसाधनाकरिता उत्तम “बेस” म्हणून वापरली जातात. ह्या प्रकारच्या क्रीम्स मध्ये सिलिकॉनचे बारीक कण असतात. त्वचेवरील असमानता किंवा रखरखीतपणा घालवून ही क्रीम्स त्वचेला सुंदर आणि नितळ बनविण्यास सहायक असतात. पण ह्या क्रीमच्या जोडीने इतर प्रसाधने वापरायची झाल्यास, ह्या क्रीमचा वापर अगदी थोड्याच प्रमाणात करायला हवा. ह्या क्रीमच्या जोडीला टोनर वापरणेही आवश्यक आहे.

५. इ इ क्रीम्स – “extra exfoliation” म्हणजेच त्वचेवरील मृत पेशी हटविण्याच्या कामी ही ‘इ इ’ क्रीम्स वापरली जातात. ह्या क्रीम्सच्या वापरामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन त्वचेला नवा तजेला मिळण्यास मदत होते, त्याचबरोबर उन्हामुळे किंवा हवेतील प्रदूषणामुळे त्वचेवर झालेले दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. मात्र ह्या क्रीम्सचा वापर रोजच्यारोज करू नये. अति-संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी ह्या क्रीम्सचा वापर टाळावा.

Leave a Comment